सायबर गुन्ह्याच्या जनजागृतीसाठी “सायबर जागृती यात्रा” Ø शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

0
65

सायबर गुन्ह्याच्या जनजागृतीसाठी “सायबर जागृती यात्रा”

 

Ø शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

 

चंद्रपूर, दि. 13: विदर्भातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, तरुण वर्गामध्ये सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती करण्यासाठी “सायबर जागृती यात्रेचे” आयोजन करण्यात आले आहे.

 

सायबर गुन्ह्याबाबत माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनात, सायबर जागृती यात्रेचे मुख्य संशोधक तथा सहाय्यक प्राध्यापक आणि स्थानांतर संरचनेचे निर्देशक डॉ. नवीन मुकेश पंजाबी यांच्या अध्यक्षतेमध्ये सायबर जागृती यात्रेचे आयोजन करण्यात आले. सदर पथक संशोधन व जागरूकता उपक्रमांतर्गत लघु संशोधन प्रकल्पाकरीता माहिती संकलित करण्यासाठी मणिभवन गांधी संग्रहालय, मुंबई येथून दि. 7 फेब्रुवारी रोजी सायबर जागृती यात्रेची सुरुवात करणार आहे. सदर सायबर जागृती यात्रा वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलढाणा अशा 11 जिल्ह्यांना भेटी देऊन 17 फेब्रुवारी 2024 रोजी समारोप करणार आहे.

 

सायबर जागृती यात्रेचे मुख्य संशोधक डॉ. नवीन पंजाबी संशोधक विद्यार्थ्यांच्या पथकासह चंद्रपूर येथे आल्याने पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात सायबर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या नेतृत्वात शहरातील सरदार पटेल महाविद्यालय, जनता महाविद्यालय चंद्रपूर तसेच श्री.ज्ञानेश विद्यालय तथा महाविद्यालय,नवरगाव या ठिकाणी जाऊन शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे व त्यास प्रतिबंध करण्याच्या उपाययोजनेसंदर्भात माहिती देण्यात आली. त्यासोबतच, मोबाईल तंत्रज्ञानाचा जपून वापर करणे, आर्थिक फसवणूक झाल्यास सायबर हेल्पलाइन 1930 डायल करणे, सायबर गुन्ह्यासाठी cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तसेच मोबाईल हरवल्यास ceir.gov.in या संकेतस्थळावर कळवावे आदी सायबर गुन्हे सुरक्षिततेच्या उपाययोजनेबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.

 

यावेळी सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद काटकर, जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष, तसेच श्री. ज्ञानेश विद्यालय तथा महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. सुरेश बाकरे आदी उपस्थित होते.

 

०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here