नाशिक जिल्ह्यातील ५० अधिकाऱ्यांचार जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे अभ्यास दौरा
गावातील विकासकामांची केली प्रशंसा
कोरपना – राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान २०२३-२४ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सीईओसोबत ५० पदाधिकारी, अधिकारी, ग्रामसेवक व सरपंच मंडळींनी शनिवारी जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे अभ्यास दौरा केला असून विविध उपक्रमांची पाहणी करुन विकासकामांची प्रशंसा केली.
नाविन्यपूर्ण ग्राम पंचायतींना भेटी देऊन अभ्यास करण्याकरिता नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी महसुली विभागाबाहेर ग्रामपंचायतीचा अभ्यास दौरा करण्यासंदर्भात नाशिक जिल्हा परिषदेची आराखड्यात तरतूद केली होती. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील उपक्रमशील स्मार्ट ग्राम बिबी येथे दौरा आयोजित करण्यात आला.
जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे विद्यापीठ आपल्या गावी, बांबू प्रकल्प, वनपंचायत, पाणी पुरवठा योजना, गावातील पायाभूत सुविधा व गावाशी संबंधित इतर गोष्टींचे अवलोकन केले. यावेळी अमरावती जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. वर्षा फडोळ, नाशिकचे जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे, चंद्रपूरच्या जिल्हा आरोग्य अधिकारी अशोक कटारे यांच्यासह ५० पदाधिकारी, अधिकारी, ग्रामसेवक व सरपंच उपस्थित होते. उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांनी गावात केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली व गावाचा प्रवास समजावून सांगितला. सरपंच माधुरी टेकाम, ग्रामविकास अधिकारी धनराज डुकरे यांच्यासह गावातील नागरिकांचा यावेळी मोठा सहभाग होता.
बिबी गावातील सांडपाण्याचे अतिशय सुंदर नियोजन करण्यात आले असून प्रत्येक गावाने सांडपाण्याचे असे नियोजन करणे आवश्यक आहे. तसेच गावकऱ्यांचा लोकसहभाग वाखाण्याजोग आहे. प्रत्येक कुटुंबाने परसबाग फुलवली असून गावाच्या सौंदर्यात भर पाडली आहे. गावाचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.
– डॉ. वर्षा फडोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) नाशिक