जैवविविधतेचे जतन व संवर्धन ही काळाची गरज
Ø वनमंत्र्यांच्या हस्ते राज्य जैवविविधता मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
चंद्रपूर, दि. 19 : जैवविविधतेचे जतन व संवर्धन ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या राज्यातील जैवविविधता दर्शविणाऱ्या सन 2024 च्या बहुरंगी वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले, तेव्हा ता बोलत होते.
महाराष्ट्रातील मानचिन्हांसह राज्यातील विविध परिसरात आढळणारे वन्यप्राणी, पशू- पक्षी, फुले यांच्या सुंदर छायाचित्रांनी ही दिनदर्शिका सजली आहे. महाराष्ट्राची ही जैवविविधता सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे, असे आवाहनही यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले. मंत्रालयातील परिषद सभागृहात झालेल्या या छोटेखानी प्रकाशन समारंभास वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांच्यासह वन विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या दिनदर्शिकेत आंबा, जारुळ, शेकरु, हरियाल, निलवंत, पांढरी चिप्पी आणि पापलेट ही मानचिन्हे छापण्यात आली आहेत. याशिवाय,राज्यातील रामसर स्थळे आणि तेथे आढळणारे मोठा रोहित. मोर शराटी, रंगीत कारकोचा, पाणचिरा, पट्ट कदंब हंस, चक्रवाक यांची छायाचित्रे विशेष लक्ष वेधून घेतात. नांदूर मध्यमेश्वर, लोणार सरोवर. ठाणे खाडी येथील छायाचित्रे या दिनदर्शिकेत वापरण्यात आली आहेत.
विविध प्रजातींची फुलपाखरे, वाघ, बिबट्या सारखे प्राणी, विविध प्रजातींचे पक्षी, ठोसेघर, लिंगमळा येथील धबधबे, पश्चिम घाटात आढळणाऱ्या स्थानिक वनस्पती व प्रजाती, कास पठारावरील निसर्ग वैविध्य, सरपटणारे प्राणी, विविध ठिकाणची जैवविविधता वारसा स्थळे आदींच्या छायाचित्रांच्या समावेशाने ही दिनदर्शिका अधिक आकर्षक बनली आहे.
याशिवाय, प्रत्येक महिनानिहाय वन, पर्यावरण, जैवविविधता आदी बाबींशी निगडीत असणाऱ्या दिवसांची नोंदही आवर्जून दिनदर्शिकेमध्ये घेण्यात आली आहे.
००००००