*अस्थिविसर्जन करताना प्राण गमावणाऱ्यांच्या कुटुंबियांना 15 लाखांची मदत*

0
100

*अस्थिविसर्जन करताना प्राण गमावणाऱ्यांच्या कुटुंबियांना 15 लाखांची मदत*

 

*ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तरतूद*

 

*चंद्रपर, दि.16* : नोव्हेंबर महिन्यात नांदगाव पोडे (ता. बल्लारपूर) येथील रहिवासी असलेल्या गोविंद पाडूंरगं पोडे, चैतन्य गोविंद पोडे आणि उज्वल रविंद्र उपरे या तिघांचा अस्थिविसर्जन करतांना मृत्यु झाला होता. या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना वने व सांस्कृतिक कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत जाहीर झाली आहे.ना .मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि मृतांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 5 लक्ष रुपये याप्रमाणे एकूण 15 लक्ष रुपयांची मदत जाहीर झाली आहे.

 

19 नोव्हेंबर 2023 रोजी गोविंद पोडे, त्यांचा मुलगा चैतन्य आणि नातेवाईक उज्वल रविंद्र उपरे हे तिघेही जण इरई व वर्धा नदीच्या संगमावर अस्थिविसर्जन करीत असतांना त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने शासनाकडे अर्थ सहाय्याकरिता प्रस्ताव पाठविला. प्रस्ताव पाठविल्यानंतर श्री. मुनगंटीवार यांनी विशेष लक्ष दिले आणि सातत्याने पाठपुरावा केला.

 

प्रस्ताव पाठविल्यानंतर दोन महिन्याच्या आतच मुख्यमंत्री सचिवालयाने मृतांच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी 5 लक्ष रुपये याप्रमाणे तीन कुटुंबांसाठी 15 लक्ष रुपये इतके अर्थसहाय्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर केले आहे. हा निधी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेतून, चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे खाते असलेल्या बँक खात्यात परस्पर वर्ग करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here