उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्धार

0
62

*चंद्रपूर, दि.३०*- माझ्या कुटुंबात मी वगळता तेरा डॉक्टर आहेत. मी वैद्यकीय क्षेत्रात नसलो तरीही रुग्णसेवेमध्ये योगदान देण्याची माझी सुरुवातीपासून इच्छा होती. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य नागरिकांना, समाजातील उपेक्षित व गरीब जनतेला उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्धार बाळगलेला आहे, असे प्रतिपादन वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी काल (रविवारी) केले.

डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या जयंतीनिमित्त निःशुल्क हृदयरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. चंद्रपूर येथील श्री माता कन्यका सेवा संस्था व मुंबई येथील फोर्टिस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी १ दिवस ते १८ वर्षे वयोगटातील १४५ मुलांमुलींची हृदयरोग तपासणी करण्यात आली. तसेच ज्यांना आवश्यकता आहे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील फोर्टिस हॉस्पिटल येथे आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला वनप्रबोधीनीचे संचालक एम.एस. रेड्डी, फोर्टिस हॉस्पिटलचे डॉ. आशुतोष पांडे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, फोर्टिसच्या डॉ. स्वाती गरेकर व डॉ. भारत सोनी, आयएमएच्या अध्यक्ष डॉ. कीर्ती साने, डॉ. रोहन आईंचवार, सचिव डॉ. कल्पना गुलवाडे, इको टुरिझमचे सदस्य प्रकाश धारणे व अरुण तिखे, ब्रिजभूषण पाझारे, कन्यका सेवा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कापर्तीवार, सचिव राजेश्वर सुरावार, वैद्यकीय सहाय्यक सागर खडसे, एसएनडीटीचे संचालक डॉ. इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

ना. श्री. मुनगंटीवार यांनी सुरुवातीलाच फोर्टिस हॉस्पिटलचे डॉ. आशुतोष पांडे व त्यांची चमू, स्थानिक डॉक्टर, शिबिरात सहभागी झालेले पालक व पाल्य सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. ‘रुग्णसेवा ही ईश्वरसेवा आहे. त्यामुळे या कार्यात कुणी सहभागी होतो तेव्हा मला मनस्वी आनंद होतो. पालकमंत्री म्हणून त्या सर्वांचे मी आभारही मानतो,’ असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. यापूर्वी ‘मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये मी हृदयरोगावर उपचार घेणाऱ्या मुलांना बघितले. त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस भाव बघितले. अनेक मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना या त्रासातून मुक्त केलेले बघितले. त्यांचा व कुटुंबाचा आनंद बघून . पुन्हा आपण आपल्या मुलांच्या हृदयरोगाचे निदान करायला हवे, असा विचार माझ्या मनात आला. आणि या शिबिराचे आयोजन निश्चित केले ,’ असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

महाराष्ट्र सरकार रुग्णसेवेसाठी कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी चंद्रपूरमधील विस्तारित वैद्यकीय सेवांचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, ‘चंद्रपूरमध्ये आता उत्तम मेडिकल कॉलेज होत आहे. टाटा कॅन्सर हॉस्पिटल आकाराला येत आहे. १४ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे काम पूर्ण झाले असून ग्रामीण रुग्णालये देखील अद्ययावत होत आहेत. याशिवाय शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानाकडून एमआरआय मशीनसाठी निधी उपलब्ध होत आहे. या सोबतच आपले जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकट व्हावी आणि रुग्णांना योग्यवेळी योग्य उपचार मिळावा, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.’

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश्वर सुरावार, सूत्रसंचालन डॉ. मंगेश गुलवाडे तर आभार प्रदर्शन अरुण तिखे यांनी केले

*आरोग्य शिबिरातील गर्दी कमी होईल तेव्हा…*

आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना सेवा पुरविण्याचे काम झालेच पाहिजे. ते अत्यंत आवश्यक आहे. पण ज्या दिवशी आरोग्य शिबिरांमधील संख्या कमी होईल तेव्हाच आरोग्य यंत्रणा उत्तम आहे, असा दावा आपल्याला करता येईल,’ असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात मेडिकल कॉलेज व डॉक्टरांची संख्या वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

*१ लाख नागरिकांची नेत्र तपासणी*
श्री माता कन्यका सेवा संस्थेची स्थापना २०१७ मध्ये झाली. त्यानंतर संस्थेच्या वतीने सातत्याने आरोग्य सेवा केली जात आहे. नेत्र चिकित्सा शिबिरांतर्गत आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच ४८ हजार रुग्णांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तर श्री माता कन्यका सेवा संस्थेच्या वतीनेच १२ हजार रुग्णांच्या डोळ्यांवर सेवाग्राम येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. याशिवाय कोरोना काळातही संस्थेने मोठ्या प्रमाणात नागरिकांची सेवा केली. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा असो वा वैद्यकीय सोयी असो, प्रत्येक कार्यात संस्था आघाडीवर होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here