*उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देता आले हे माझे भाग्य* *पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या भावना*

0
26

*उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देता आले हे माझे भाग्य*

*पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या भावना*

*बाबूपेठ उड्डाणपुलाचे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल’ नामकरण*

*समाजाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याची दिली ग्वाही*

*चंद्रपूर, दि.१५ – भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या दिवशी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर लाखोंच्या समुदायाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. शोषित, वंचितांचा आवाज बुलंद केला. बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन संघटीत भावनेने कार्य करावे. आज उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देता आले, हे माझेच भाग्य समजतो, अशी भावना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी केले.*

चंद्रपूर येथील बाबूपेठ उड्डाणपूलाचे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल’ असे नामकरण मंगळवारी (दि.१५) करण्यात आले. त्यावेळी ना. श्री. मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमाला माजी समाजकल्याण सभापती ब्रीजभूषण पाझारे, महानगराचे अध्यक्ष राहुल पावडे, मंगेश गुलवाडे, सूरज पेदुलवार, प्रज्वलंत कडू, किरण बुटले, सविता कांबळे, धम्मप्रकाश भस्मे, संदीप आगलावे,प्रदीप किरमे, कल्पना बगुलकर, आकाश ठुसे, दशरथ सोनकुसरे, प्रमोद रामटेके यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बाबूपेठ उड्डाणपूलाचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नामकरण झाल्याचे जाहीर केले. उड्डाणपुलाचा नामविस्तार झाल्याबरोबर बाबासाहेबांचे नाव दर्शनी भागात दिसेल असे लावण्याची सूचना देखील त्यांनी केली. ज्या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चंद्रपुरातील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्याच दिवशी उड्डाणपूलाला बाबासाहेबांचे नाव देणे हा सुवर्ण कांचन योग असल्याचे ना.श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

बाबूपेठ भागात उड्डाणपूल व्हावे ही अनेक वर्षांची मागणी होती. राज्याचा अर्थमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली व त्यावेळी यासाठी पुढाकार घेतला. या जागेवर असलेल्या झोपड्यांचा मोठा प्रश्न पुढे होता. एकीकडे कायदा होता तर एकीकडे मानवता भाव होता. मात्र कॅबिनेटमध्ये विशेष बाब करून झोपडपट्टी धारकांना मोबदला मिळवून दिला. हा उड्डाणपूल यापूर्वीच व्हावा असे प्रयत्न होते. मात्र पुढे महाविकास आघाडी आणि कोव्हिडमुळे विलंब झाल्याचेही ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

बाबूपेठ भागामध्ये अनेक विकास कामांना मूर्त रूप दिल्याचे ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘बाबूपेठमध्ये पहिल्यांदा एपीजे अब्दुल कलाम उद्यान केले. येथील मैदानात स्टेडियम व्हावे अशी मागणी झाली त्या ठिकाणी स्टेडियम केले. रस्ते खराब झाल्याने सरकार नसतानाही तत्कालीन सरकारशी भांडून १६ कोटी रुपयांचे रस्त्यांना मंजूरी मिळवून दिली. उड्डाणपूल पूर्ण केला. आता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शाळा पंतप्रधान योजनेमध्ये दत्तक दिली. यासोबतच नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातील शाळेला ३ कोटी रुपये निधी मंजूर केला. या शाळेत गोरगरीबांची ११०० मुले शिकतात. त्या मुलांना याचा फायदा होईल, असेही ते म्हणाले.

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते सर्वजण सेवेसाठी तत्पर आहोत. कधीही विकासाच्या कामात जात पाहिली नाही. मात्र तरीही काही लोक विष पेरण्याचे काम करतात व विकासात आडकाठी करण्याचे काम करतात, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here