बल्लारपूर तालुका विकासाच्या बाबतीत कायम अग्रेसर राहणार

0
15

बल्लारपूर तालुका विकासाच्या बाबतीत कायम अग्रेसर राहणार

 

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली ग्वाही

 

Ø 3 कोटी 81 लक्ष रुपयांच्या काँक्रिट रोड व पेव्हिंग ब्लॉकच्या बांधकामाचे भूमिपूजन

 

चंद्रपूर, दि. 7 : बल्लारपूरमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली आहेत. यात सैनिकी शाळा, बॉटनिकल गार्डन, एसएनडीटी विद्यापीठाचे उपकेंद्र, क्रीडा संकुल, बस स्थानक, रेल्वे स्थानक तसेच रस्ते विकासाची कामे पूर्णत्वास आली आहेत. या शहरातील विकास पाहून बल्लारपूरचे नाव गौरवाने घेतले जाते. त्यामुळे राज्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत बल्लारपूर विकासाच्या बाबतीत कायम अग्रेसर राहील, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

 

बल्लारपूर येथील कन्नमवार वार्ड, प्रभाग क्र. 2 येथे सिमेंट काँक्रीट रोड व पेव्हिंग ब्लॉकच्या बांधकामाचे भूमिपूजन मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ, राजबहादुर सिंग, वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, हरीश शर्मा आदी उपस्थित होते.

 

राजकारणात आलो तेव्हापासून सर्वसामान्य गोरगरीब जनतेची मनोभावे सेवा करण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने सातत्याने पाऊल टाकले आहे, असे मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले. ‘नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कन्नमवार वॉर्ड येथे 3 कोटी 81 लक्ष 47 हजार रुपये खर्च करून 367 मीटर लांबीचा सिमेंट काँक्रीट रोड व पेव्हिंग ब्लॉकचे बांधकाम होणार आहे. या कामाचे भूमिपूजन करताना मला मनस्वी आनंद होत आहे. मागील कार्यकाळात बल्लारपूरला तहसीलचा दर्जा मिळवून दिला. बल्लारपूरमध्ये विदर्भातील उत्तम अशी नगर परिषदेची इमारत उभी होत आहे. या शहरातील विकास पाहून बल्लारपूरचे नाव गौरवाने घेतले जाते. पण एवढ्यावर न थांबता विकासाची घोडदौड अशीच कायम ठेवण्याचा संकल्प मी केला आहे. यासाठी बल्लारपूरवासियांच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.

 

बल्लारपूरमध्ये गरिबांना घरे मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. रमाई आवास व शबरी आवास योजनेचे अनुदान वाढवून देण्यात आले आहे. 11 जानेवारीपासून आदिवासी बांधवांकरीता शबरी आवास योजना शहरात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये रमाई, शबरी व ओबीसी बांधवांच्या आवास योजनेसाठी घरकुलांना समान अनुदान देण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे, याचाही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आवर्जुन उल्लेख केला.

 

मिळेल जमिनीचे पट्टे, हक्काचे घर

 

ते पुढे म्हणाले, ‘स्वातंत्र्यानंतर बल्लारपूरमध्ये एन.टी. बांधवांसाठी 4 हजार घरे तर चंद्रपुरातील म्हाडामध्ये ऑटो चालकांना अल्पदरात घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घरे’ संकल्पाला पुढे नेण्याचे काम सुरू आहे. येत्या पाच वर्षात बल्लारपुरातील बेघरांना स्वतःच्या हक्काचे घर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 12 हजार पेक्षा जास्त कुटुंबांना जमिनीच्या मालकीहक्काचे पट्टे उपलब्ध करून देणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here