नागपूर-हैदराबाद ‘वंदे भारत’ ट्रेन 16 सप्टेंबरपासून सुरू

0
65

नागपूर-हैदराबाद ‘वंदे भारत’ ट्रेन 16 सप्टेंबरपासून सुरू

 

Ø पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाली रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी

 

Ø चंद्रपूर- बल्लारशाह रेल्वे स्थानकावर होणार भव्य स्वागत

 

चंद्रपूर,दि.13 : नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसची मागणी आणि त्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे मंत्री आश्विनीकुमार वैष्णव यांना प्रत्यक्ष भेटत दोन वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. सोमवारी 16 सप्टेंबर रोजी चंद्रपूर येथे सायंकाळी 6.20 वाजता आणि बल्लारशाह रेल्वे स्थानकावर सायंकाळी 6.40 वाजता नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेसचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.

 

मुंबई-अहमदाबाद प्रमाणे नागपूर ते हैदराबाद करिता वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याबाबत वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 7 डिसेंबर 2022 रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना पत्राद्वारे मागणी केली होती. नागपूर ते हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्यास नागपूरसह विदर्भातील सर्वसामान्यांसह विद्यार्थी, रुग्ण, व्यापारी, नागरिक या सर्वांना मोठा लाभ होणार असल्याचेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले होते. पत्र व्यवहारानंतर या मागणीसंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. श्री. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून नागपूर ते हैदराबाद वंदे भारत एक्सक्प्रेसला मंजुरी प्रदान करण्यात आली.

 

रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाचे विदर्भातील जनतेकडून स्वागत करण्यात येत आहे. सोमवारी 16 सप्टेंबर रोजी चंद्रपूर येथे सायंकाळी 6.20 वाजता आणि बल्लारपूर येथील जनतेकडून सायंकाळी 6.40 वाजता नागपूर ते हैदराबाद वंदे भारत एक्सक्प्रेसचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जाहीर आभार देखील मानण्यात येईल, अशी माहिती झेडआरयूसीसी मध्य रेल्वे झोन मुंबईचे सदस्य, एनआरयूसीसी रेल्वे मंत्रालय नवी दिल्लीचे सदस्य अजय दुबे यांनी दिली आहे.

 

एकूण पाच थांबे, त्यातील दोन चंद्रपूर जिल्ह्यात : अतिजलद अत्याधुनिक व आरामदायक वंदे भारत एक्सप्रेस ही 20 डब्यांची राहणार आहे. नागपूर ते सिकंदराबाद (हैदराबाद) हे 578 किलोमीटर अंतर ताशी 130 किमी वेगाने पार करेल. नागपूर ते सिकंदराबाद (हैदराबाद) वंदे भारत एक्सप्रेसला एकूण पाच थांबे देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील दोन थांबे चंद्रपूर जिल्ह्यातच देण्यात आले आहेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष पुढाकाराने चंद्रपूर जिल्हावासीयांना ही भेट मिळाली आहे. वंदे भारत एक्सप्रेस नागपूर येथून सुटल्यानंतर सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारपूर, रामगुडंम, काजीपेठ येथील प्रवाशांना घेऊन सिकंदराबाद येथे पोहोचणार आहे.

 

००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here