शिक्षण, संस्कृती आणि संस्कारातून करा जीवनाची वाटचाल*

0
16

*शिक्षण, संस्कृती आणि संस्कारातून करा जीवनाची वाटचाल*

 

*पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे विद्यार्थ्यांना आवाहन*

 

*महर्षी विद्या मंदिर येथे पुलाचे लोकार्पण*

 

*’एक झाड एक विद्यार्थी’ उपक्रमाचा शुभारंभ*

 

*चंद्रपूर दिनांक 10 : भारताची अध्यात्मिक संस्कृती जगाने अनुभवली आहे. भारत आता शिक्षण क्षेत्रातही अग्रेसर होत आहे. मात्र संस्कृती आणि शिक्षणाला संस्कारांचीही जोड आवश्यक आहे. महर्षी विद्या मंदिरने हेच ब्रीदवाक्य जोपासले आहे. या मार्गाने विद्यार्थ्यांनी वाटचाल केली, तर त्यांचे उज्ज्वल भवितव्य निश्चित आहे, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.*

 

महर्षी विद्या मंदिर येथील पुलाचे लोकार्पण तसेच ‘एक विद्यार्थी एक झाड’ या उपक्रमाचा शुभारंभ ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष गिरीश चांडक, उपाध्यक्ष वसुधाताई कंचर्लावार, सचिव दत्तात्रय कंचर्लावार, उमेश चांडक, अनुपम चिलके, वीरेंद्र जयस्वाल, भाजपा महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, कार्यकारी अभियंता सुनील कुंबे, उपअभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, कल्पना पलीकुंडवार, मनोज सिंघवी, सोहम बुटले, उपायुक्त रवींद्र भिलावे, आदींची उपस्थिती होती.

 

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘केवळ सहा महिन्यांत 1 कोटी 97 लक्ष 63 हजार 726 रुपये खर्च करून शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता हा पूल बांधण्यात आला आहे. महर्षी विद्या मंदिर ही केवळ एक शाळा नव्हे, तर ज्ञानाचे मंदिर आहे. शिक्षण, संस्कार आणि संस्कृती हे या शाळेचे ब्रीदवाक्य असून हाच जीवनाचा खरा मार्ग आहे. आज आपण शिक्षणामध्ये अग्रेसर आहोत, मात्र संस्कारांमध्ये कमी पडत आहोत, ही एक शोकांतिका आहे. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांना संस्कारी शिक्षण मिळणे गरजेचे आहे.’

 

प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक झाड, ही शाळेची अतिशय उत्तम संकल्पना आहे. माता आणि धरणीमाता यांचे आपल्यावर फार मोठे ऋण आहे. वसुंधरेच्या रक्षणासाठी प्रत्येकाने एक झाड लावलेच पाहिजे. वृक्ष लावूनच आपण या वसुंधरेचे ऋण फेडू शकतो. देशगौरव,पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम सुरू केला असून महाराष्ट्र राज्याने वृक्ष लागवडीकरिता ‘अमृत ॲप’ विकसित केले आहे. विद्यार्थी आणि नागरिकांनी एक झाड लावून या ‘अमृत ॲप’मध्ये सेल्फी अपलोड करावा. राज्य शासनाकडून त्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांजवळ हे प्रमाणपत्र राहील त्याला भविष्यात या प्रमाणपत्रामुळे फायदा होईल, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.

 

पुढे ते म्हणाले, ‘आजपासून शाळेचे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू झाले आहे. हा प्रवास रौप्य महोत्सवापासून सुरू होऊन सुवर्ण महोत्सवापर्यंत आणि त्याहीपुढे होईल. शाळेकडून शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचाही आवर्जून प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने बघून त्यासाठी परिश्रम सुद्धा करावे. केवळ पैशाच्या मागे न धावता आनंदी, संस्कारी आणि समाधानी जीवन जगावे. या गोष्टी पैशाने विकत घेता येत नाहीत. ‘एक झाड एक विद्यार्थी’ हा शाळेने सुरु केलेला उपक्रम अतिशय चांगला आहे.’ प्रास्ताविकातून संस्थेचे अध्यक्ष गिरीश चांडक यांनी उपक्रमाबद्दल माहिती दिली.

 

 

*विद्यार्थी व पालकांना वृक्षांचे वाटप :* पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात साईश कोंडावार, निहाल भोयर, आर्यन चौधरी, कीर्तन पटेल, महेक बेले, प्रेरित बोरकर, अर्जुन माताघरे, नक्ष उरकुडे, इशिता ठाकरे, समाइरा राजुरकर या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना वृक्ष वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here