जिल्हाभरात विविध उपक्रमातून मतदार जनजागृती

0
29

जिल्हाभरात विविध उपक्रमातून मतदार जनजागृती

 

चंद्रपूर दि. 21 : भारत निवडणूक आयोगातर्फे लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघाकरीता पहिल्याच टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. तसेच स्वीप उपक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात मतदार जनजागृती करण्यात येत आहे.

 

देशाचे भविष्य घडविण्यासाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. त्यामुळे मतदान करणे हे आपले प्रथम कर्तव्य समजून मतदान प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांनी सहभागी व्हावे, आपल्या एका मताचे महत्त्व कळावे, पैशांनी मते विकली जाण्याचा प्रकार कुठेही होऊ नये, यासाठी प्रयत्न केला जात आहे. निवडणुकांच्या माध्यमातून देशाची लोकशाही प्रक्रिया मजबूत करण्यासाठी आपले मत योग्य उमेदवारास देणे महत्त्वाचे आहे. याबाबतची नागरीक, तरुण – तरुणींमध्ये जनजागृती केली जात आहे. यात मतदानाचे महत्व विशद करणारी रांगोळी स्पर्धा, ‘मी मतदानाचा हक्क बजावणार’ याबाबत तरुणांसाठी स्वाक्षरी मोहीम, आदी उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

ब्रम्हपूरी येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय व नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी लोकशाहीचे बळकटीकरण या विषयावर रांगोळी स्पर्धा, निवडणूक – 2024 या विषयावर केक सजावट स्पर्धा, तसेच मतदानात महिलांचा सहभाग या विषयावर नाटक व नृत्य स्पर्धा घेऊन महिला मतदारांमध्ये मतदानासंबंधी जनजागृती करण्यात आली.

 

राजकीय पक्ष मतदारांना पैशांचे प्रलोभन दाखवून प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. लोकशाहीसाठी अशा गोष्टी फारच घातक आहेत. या प्रलोभनाला बळी न पडता आपल्या एका मताचे महत्त्व लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न मतदार जनजागृती मोहिमेतून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here