मतदार जनजागृतीकरीता धावले चंद्रपूरकर   जिल्हा प्रशासनातर्फे ‘रन फॉर व्होट’ मिनी मॅरेथॉनचे आयोजन

0
25

मतदार जनजागृतीकरीता धावले चंद्रपूरकर

जिल्हा प्रशासनातर्फे ‘रन फॉर व्होट’ मिनी मॅरेथॉनचे आयोजन

 

चंद्रपूर, दि.24 : ‘एक मत…..लोकशाही बळकटीकरणासाठी, नागरिकांच्या उज्वल भविष्यासाठी’ या संकल्पनेवर आधारीत जिल्हा प्रशासन चंद्रपूरच्यावतीने आयोजित ‘रन फॉर व्होट’ मिनी मॅरेथॉनच्या माध्यमातून चंद्रपूरकरांनी मतदार जनजागृतीचा संदेश दिला. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रंजित यादव, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, संग्राम शिंदे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी आदींनी मिनी मॅरेथॉनमध्ये आपला सहभाग नोंदविला.

 

याप्रसंगी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणूक हा मुख्य केंद्रबिंदू आहे. स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदानाबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने ‘रन फॉर व्होट’ या मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. जेव्हा लोक आपल्या मतदानाच्या अधिकाराचा उपयोग करतात तेव्हा ख-या अर्थाने लोकशाही बळकटीकरणास मदत होते.

 

गत निवडणुकीमध्ये चंद्रपूरमध्ये मतदानाची टक्केवारी कमी होती. यावर मात करण्यासाठी तसेच मतदानाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करणे, त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आज चंद्रपूरकर धावले आहेत. येणा-या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावावा व देशाच्या प्रगतीला हातभार लावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले. यावेळी जिल्हाधिका-यांनी हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉनला रवाना केले.

 

चांदा क्लब ग्राऊंड येथून सुरू झालेली मिनी मॅरेथॉन -जटपूरा गेट – गिरणार चौक – जोडदेऊळ – गांधी चौक -जटपूरा गेट -आंबेडकर कॉलेज आणि परत चांदा क्लब ग्राऊंड येथे समारोप करण्यात आला.

 

००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here