लोकसभा निवडणूक २०२४ चे वारे वाहत असताना गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने विजयाचे खाते उघडले आहे. सूरतची जागा बिनविरोध जिंकण्यात सत्ताधारी पक्षाला यश आले असून, भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांचा खासदार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खरे तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठही उमेदवारांनी आपले उमेदवार अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक आयोगाकडून याची घोषणा केली जाईल. सूरत येथील काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द झाल्याने समीकरणे बदलली होती. तर दरम्यान, बिनविरोध निवड झालेले मुकेश दलाल हे गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात. सूरतच्या जागेवरून प्रथमच एखादा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. इतर सर्व उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे दलाल यांचा विजय निश्चित झाला. निवडणूक आयोगाकडून दलाल यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली जाईल. आता गुजरातच्या २५ जागांसाठी सात मे रोजी मतदान होणार आहे. काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांनी उच्च न्यायालयात याप्रकरणी धाव घेतली आहे, मात्र अद्याप कोणतीही अपडेट समोर आली नाही. अशा स्थितीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्याने मुकेश दलाल विजयी झाले आहेत.बसपाचे उमेदवार प्यारे लाल भारती यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला.