*नवजीवन नगर वाचनालयाचा आदर्श वाचक पुरस्कार ‘प्रिन्स सुनील पाटील’ याला जाहीर*

0
23

*नवजीवन नगर वाचनालयाचा आदर्श वाचक पुरस्कार ‘प्रिन्स सुनील पाटील’ याला जाहीर*

(जयसिंगपूर)

धरणगुत्ती येथील ‘पुस्तकांचे घर’ आणि ‘वाचनालय आपल्या दारी’ या सारख्या वाचन चळवळीला बळकटी देणार्‍या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सातत्याने वाचन करावे यासाठी राबवलेल्या अभिनव आणि समाजहिताच्या आदर्शवत उपक्रमाचे संकल्पक आणि सामाजिक जाणिवांचे भान ठेवणारे उद्योजक डॉ. सुनील दादा पाटील यांचे चिरंजीव ‘प्रिन्स सुनील पाटील’ याला नांदणी येथील श्री नवजीवन नगर वाचनालयाचा बाल विभागातून ‘आदर्श वाचक पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला आहे.

समाजात वाचन संस्कृती रुजावी, विद्यार्थ्यांना तनावमुक्त जीवन जगता यावे, कौटुंबिक स्वास्थ्य जपले जावे, या उद्देशाने ‘वाचनालय आपल्या दारी’ या वाचन चळवळीची डॉ. सुनील दादा पाटील आणि सौ. संजीवनी सुनील पाटील दांपत्याने धरणगुत्ती या गावात स्थापना केली. गेल्या अनेक वर्षांपासून ‘वाचनालय आपल्या दारी’ हा उपक्रम विविध शाळांच्या माध्यमातून सुरू आहे. ‘वाचू, लिहू, व्यक्त होऊ, आनंदाने जीवन जगू’ असे ब्रीदवाक्य घेऊन नव्या पिढीच्या संस्काराचे काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सातत्याने वाचतात, लिहितात आणि आनंदाने जीवन जगत आहेत. आजवर शेकडो विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासली असून ‘वाचनालय आपल्या दारी’ हा प्रयोग मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आहे; सदर उपक्रम संपूर्ण महाराष्ट्राला एक आदर्शवत असून विविध ठिकाणावरून अनेक विद्यार्थी जोडले जात असून त्यांचेही आयुष्य वाचनाच्या माध्यमातून समृद्ध करण्यासाठी समाजातील अनेक घटकांच्या मदतीने आणि सहकार्याने अनेक पातळीवर सर्वसमावेशक प्रयत्न केले जात आहेत.

इसवी सन २००१ मध्ये स्थापन झालेले श्री नवजीवन नगर वाचनालय, नांदणी हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक समृद्ध आणि आदर्श ग्रंथालय असून ‘ग्रंथालयाच्या कार्यकारिणी मंडळावर सर्व महिला संचालिका असणारे महाराष्ट्रातील एकमेव ग्रंथालय’ असून त्यांची स्व:मालकीची प्रशस्त अशी तीन मजली इमारत आहे. वाचनालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागात वाचन संस्कृती टिकवण्याचा आणि वृद्धिंगत करण्याचा कसोशीने सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. यासाठी सर्व प्रकारच्या वाचकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविले जातात.

स्वामी विवेकानंद यांच्या १६१ व्या जयंती निमित्त शुक्रवार दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी ‘ग्रंथदान दिन’ साजरा केला जाणार आहे. तसेच भव्य ग्रंथप्रदर्शन, ग्रंथदिंडी, व्याख्यान व गुणवंतांचा सत्कार इत्यादि भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन सालाबादाप्रमाणे केले आहे. या दिवशी समाजातील विविध घटकांकडून वाचनालयासाठी ग्रंथभेट स्वीकारली जाणार आहे. तरी दानशूर व्यक्तींनी आपल्याकडील नवी किंवा जुनी पुस्तके ग्रंथालयाला दान करून सहकार्य करावे असे आवाहन ग्रंथालयाच्या अध्यक्षा सौ. पद्मिनी आण्णासाहेब चकोते यांनी केले आहे.

चिरंजीव ‘प्रिन्स सुनील पाटील’ हा जयसिंगपूर येथील जयप्रभा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इंग्रजी माध्यमात इयत्ता सहावीमध्ये शिकत असून त्याला लहानपणापासूनच वाचनाची मोठी आवड आहे. मराठी – हिंदी आणि इंग्रजी भाषेतील शेकडो पुस्तकांचे त्याने आजपर्यंत वाचन केले असून त्याचे वक्तृत्वसुद्धा चांगले आहे. पुस्तकांचे वाचन करून संबंधित लेखकाला सदर पुस्तकाबाबत पत्र पाठवून तो आपली प्रतिक्रिया सातत्याने कळवत असतो यातून संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक मान्यवर लेखकांशी त्याची पत्रमैत्री झाली आहे. शालेय अभ्यासक्रमात साहित्याचा समावेश असलेल्या अनेक लेखकांना तो प्रत्यक्ष भेटला असून त्यांच्याशी विविध विषयांवर त्याने चर्चा केलेली आहे. खेळ, संगीत आणि चित्रकला या विषयातसुद्धा त्याला विशेष रुचि आहे. नुकत्याच झालेल्या ऑलंपियाड परीक्षांमध्ये त्याला अनेक सुवर्ण पदके मिळालेली आहेत. त्याची आई सौ. संजीवनी सुनील पाटील त्याला सातत्याने वाचनासाठी प्रोत्साहित करतात आणि वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके त्याला उपलब्ध करून देतात. प्रिन्स सुनील पाटील हा दररोज तीन दैनिके आणि किमान एकतरी पुस्तक वाचतो; त्यांच्याकडे अनेक साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंक नियमित येत असतात शिवाय त्यांच्या परिवाराकडून मोठ्या प्रमाणात पुस्तकांची खरेदी सातत्याने केली जाते. श्री नवजीवन नगर वाचनालय, नांदणी येथे नियमितपणे पुस्तकांची आदान – प्रदान करण्यासाठी जाणारा तो एक आदर्श बालवाचक आहे. इतर मुलांनी वाचन करावे म्हणून तो आपल्या मित्र – मैत्रिणी आणि संबंधितांना मोठ्या प्रमाणात ग्रंथभेट देत असतो.

त्याच्या वाचन – लेखन या छंदाची प्रेरणा आणि मार्गदर्शक सौ. रोजमेरी आणि राज धुदाट हे असून जयप्रभा इंग्लिश मिडियम स्कूल मधील सर्वच शिक्षक, वर्गशिक्षिका सौ. पुष्पा नितीन दानेकर आणि मुख्याध्यापक राहुल नौकूडकर यांचे वेळोवेळी विशेष सहकार्य त्याला लाभले आहे.

सदर कार्यक्रमात विविध क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या मान्यवरांचा आणि आदर्श वाचकांचा सत्कार केला जाणार आहे. चिरंजीव ‘प्रिन्स सुनील पाटील’ याची पुस्तक व साहित्याविषयीची विशेष आवड बघून श्री नवजीवन नगर वाचनालयाने बाल विभागातून ‘आदर्श वाचक’ पुरस्कारासाठी निवड केली आहे. शुक्रवार दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता नवजीवन चौक, नांदणी, तालुका – शिरोळ, जिल्हा – कोल्हापूर येथे अनेक मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन उपाध्यक्षा सौ. भाग्यश्री अजित लठ्ठे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here