पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे ३०० वे जन्म वर्ष शासनाकडून भव्य स्वरूपात साजरे होणार
Ø महाराष्ट्राच्या सहा महसुली विभागात प्रयोगात्मक कलेच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन चरित्र अनुभवता येणार
Ø प्रियदर्शनी सभागृह चंद्रपूर येथे १४ ऑक्टोबर २०२४ रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
चंद्रपूर/मुंबई, दि. 13 : 14 आक्टो रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्म वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन अहिल्यानगर येथे होणार असून त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित एक भव्य चित्ररथ अहिल्यानगर जिल्ह्यात प्रदर्शन केले जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वर आधारित एका विद्वत्त परिषदेचे आयोजन छत्रपती संभाजी नगर विद्यापीठामध्ये करण्यात येणार आहे. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्म वर्षाचा भाग म्हणून महाराष्ट्राच्या सहा महसुली विभागात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमातून प्रयोगात्मक कलेच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्राचे सादरीकरण जनसामान्यापुढे करण्यात येणार आहे. त्यामुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळेल या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची असून मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे यांच्या मार्गदर्शनातून या उपक्रमाचे भव्य सादरीकरण होणार आहे. सहा महसुली विभागापैकी नागपूर विभागातील सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह चंद्रपूर या ठिकाणी दिनांक १४ ऑक्टोबर,२०२४ रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजन करण्यात येणार आहे .
या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, तसेच स्थानिक खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. रसिक प्रेक्षकांना हा कार्यक्रम विनामूल्य असून रसिक प्रेक्षकांनी उपस्थिती लावावी, असे आवाहन विभीषण चवरे संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.