*”कलासेतू” पोर्टल कलावंतांसाठी हक्काचे माहेरघर*
*सांस्कृतिक कार्यमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास*
*ना. श्री. मुनगंटीवार यांनी कलावंतांना आणले ऑनलाइन व्यासपीठावर*
*मुंबई, दि.०९ – सदैव कलावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे राज्याचे सांस्कृतिक मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यभरातील कलावंतांना कलासेतू या ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून एकत्र आणले आहे. त्यांच्या संकल्पनेचे सांस्कृतिक क्षेत्रात स्वागत होत आहे. या पोर्टलचे ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले.*
मंत्रालयातील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. विकास खारगे, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. स्वाती म्हसे पाटील, भाजपा चित्रपट आघाडी प्रमुख श्री. संदीप जी घुगे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील मराठी लेखक,दिग्दर्शक यांच्यासाठी राज्यसरकारने नवे ऑनलाइन व्यासपीठ तयार केले आहे. कलासेतू या नव्या मराठी पोर्टलचे उद्घाटन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्ये व मत्सव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. “कलासेतू” पोर्टल हे व्यासपीठ विशेषतः चित्रपट कथा आणि पटकथा लेखकांसाठी त्यांच्या कथा-पटकथा-संहिता अपलोड करण्यासाठी, नोंदणी करण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी तयार केलेले आहे. या व्यासपीठाद्वारे निर्माते, दिग्दर्शक आणि सृजनशील क्षेत्रातील तसेच मनोरंजन विश्वातील व्यक्तींसाठी थेट संकेतस्थळावरुन कथा, संकल्पना, पटकथा पाहण्यासाठी आणि मुल्यमापन करण्यासाठी सहायभूत तसेच उपलब्ध होणार आहेत. कोणत्याही पटकथा लेखकाला त्याचे काम अपलोड करण्याची सुविधा देऊन हा मंच त्यांच्यासाठी जगासमोर येण्याची आणि चित्रपट लेखनाच्या जगात स्वतःची ओळख निर्माण करण्याची मोठी संधी ठरणार आहे. लेखक आपले काम जगातील कोणत्याही ठिकाणावरुन कोणत्याही वेळी आपली कथा-पटकथा-संहिता या पोर्टलवर काही सोप्या टप्प्यांमध्ये नोंदवू शकतो. “कलासेतू” पोर्टल सृजनशील लेखक आणि नविन कल्पनांच्या शोधात असणारे कलासक्त निर्माते/संस्था तसेच इतरही घटकांसाठी सेतू म्हणून काम करेल तसेच चित्रपट उद्योगाच्या अखंड वाटचालीसाठी एक विश्वासार्ह, महत्वाचे व्यासपीठ म्हणूनही काम करणार आहे.
नव्या सर्जनशील संकल्पनांच्या शोधात असलेली कलासक्त मंडळी आणि लेखणीच्या जोरावर नव्या विश्वाची निर्मिती करु पाहणारे होतकरु प्रतिभावंत यांच्यामधला हा अनोखा सेतू राज्याच्या आणि देशाच्या सांस्कृतिक नकाशाला अधिक व्यापक, समृध्द आणि वैश्विक करेल यात शंकाच नाही. कारण यथावकाश आणि क्रमाक्रमाने या अनोख्या पोर्टलद्वारे गीतकार, संगीतकार, सकंलक, छायालेखक, वेशभूषाकार, केशभूषाकार, निर्मिती प्रमुख, कला दिग्दर्शक अशा मनोरंजन क्षेत्रातील सर्व प्रकारच्या तंत्रज्ञ व कलावंतांसाठी हे व्यासपीठ हक्काचे माहेरघर बनेल असा दृढ विश्वास राज्याचे वने,सांस्कृतिक कार्ये व मत्सव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी “कलासेतू “ पोर्टल मंचच्या उद्घाटनवेळी व्यक्त केली.