जागतिक रेबीज दिनानिमित्त जनजागृती
अमरावती, दि. 27 (जिमाका) : जागतिक रेबीज दिन दि. 28 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. रेबीज दिनानिमित्त आजाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
नागरिकांना रेबीजबद्दल जागरूक करण्यासाठी आणि प्राणघातक आजारापासून वाचवण्यासाठी दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी रेबीज दिन साजरा करण्यात येतो. जागतिक रेबीज दिनाचा उद्देश मानव आणि प्राण्यांवर रेबीजच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता वाढविणे, धोकादायक रोग रोखता येईल, याविषयी माहिती आणि सल्ला प्रदान करणे आणि रेबीज नियंत्रणातील वाढीव प्रयत्नांसाठी प्रयत्न करणे आहे.
रेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी कुत्रा, ससा, माकड, मांजर चावल्यानंतर होतो. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास म्हणतात. रेबीज रोग झाल्यास प्राणघातक आहे. मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. रेबीज हा रोग कुत्र्यांनाही होतो. हा कुत्र्यांमुळे माणसात पसरणारा रोग आहे. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे 90 ते 175 दिवसात दिसू लागतात. जंगलातले लांडगे जंगली कुत्र्यांना चावतात, त्यामुळे जंगली कुत्र्यांना रेबीज होतो. ही जंगली कुत्री गावातल्या कुत्र्यांना चावतात, त्यामुळे त्यांना हा रोग होतो. आणि रेबीज झालेली कुत्री माणसांना चावल्यास हा रोग होतो. कुत्र्यांच्या लाळेद्वारे रोगाचा प्रसार होतो.
या रोगाची लक्षणे ही साधारणपणे 2 ते 12 आठवडे ताप आणि तापाची लक्षणे दिसतात. मानसिक त्रास, निद्रानाश, भास होणे, सामान्य माणसासारखे न वागणे, अतिशयोक्ती करत वागणे अशी लक्षणे दिसून येतात. रेबीज झालेल्या माणसाला पाण्याची भिती वाटते. रेबीज झालेल्या माणसाचा घसा पूर्णपणे खरवडून निघतो. माणूस काही बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा घसा खरवडलेला असल्यामुळे कुत्र्याच्या भुंकण्याप्रमाणे आवाज येतो. वास्तविक कुत्रा चावला म्हणून असा आवाज येतो असे नाही. पण काही अशिक्षित माणसे असा विचार करून कुत्र्यांना मारतात.
या आजारावर उपचार म्हणून चावल्याने जखम झाल्यावर लवकरात लवकर साबण व स्वच्छ पाण्याने धुतल्यास जखमेतील रेबीजचे जंतू कमी होण्यास मदत होते. शक्य असल्यास त्यावर ॲण्टीसेप्टीक मलम लावावे. त्वरीत जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रेबीजवर पीईपी पोस्ट एक्स्पोजर प्रोफायलॅक्सिस ही प्रभावी लस उपलब्ध असून कुत्रे चावल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ती टोचून घेणे योग्य आहे. पेशंटने मानवी रेबीज इम्युनोग्लोबुलिनचा एक डोस व रेबीज लसीचे चार डोस 28 दिवसात घेतले पाहिजेत. रेबीज लसीचा पहिला डोस जखम झाल्यावर लवकरात लवकर घेतला पाहिजे. त्यानंतर 3 दिवस, 7 दिवस आणि 28 दिवसांनी लसीचे डोस द्यावेत. आता पोटात घ्यायचे इंजेक्शन देण्याची गरज नसून दंडावर देण्याचे इंजेक्शन उपलब्ध आहे, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.
000000
—