जलजन्य व कीटकजन्य आजाराच्या साथीला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाच्या सूचना
अमरावती, दि. 25 : दरवर्षी पावसाळयात व पावसाळयानंतर जलजन्य व कीटकजन्य आजाराच्या साथी पसरतात. पावसाळ्यात पाण्याचे स्रोत दूषित होतात. त्यामुळे गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, कावीळ, विषमज्वर, विषाणूजन्य या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. ठिकठिकाणी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होऊन हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनियासारखे आजार वाढतात. यासाठी आरोग्य विभागामार्फत आरोग्य शिबिरांचे आयोजन करुन नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. किरकोळ आजारावर उपचार करुण संशयित रुग्णांचे रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे. या आजारांना आळा घालण्यासाठी आरोग्य कर्मचारी सर्वेक्षण करीत आहेत. यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी दिली आहे.
जलजन्य व कीटकजन्य आजाराच्या साथीला आळा घालण्यासाठी शुध्द पाण्याचा पिण्यासाठी वापर करा. गावातील विहिरीचे शुध्दीकरण करुन घ्यावे. आपल्या घराचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. परिसरातील नाल्या, गटारी, डबकी यात पाणी तुंबू नये याबाबत दक्ष रहावे, आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, सांडपाण्यासाठी शोषखड्डा व परसबाग निर्माण करावी, आजारी व्यक्ती व लहान मुलांना पाणी उकळून गार करुन प्यावयास दयावे. साथीचे आजार बळावल्यास सर्वप्रथम आशा, आरोग्य सेवक, सेविका प्राथमिक आरोग्य केंद्रास सूचना दयाव्यात, साचलेल्या पाण्यामध्ये ऑईल, गोडे तेल टाकावे जेणेकरुन डास उत्पत्ती होणार नाहीत. भाजीपाला व फळे मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यावीत. ग्रामपंचायतकडून धूर फवारणी करुण घेण्यात यावी. आपल्या छतावरील टायर व रिकाम्या प्लास्टिकच्या बॉटल्स तसेच इतर पाणी साचणारे साहित्य काढून टाकावे. झोपतांन मच्छरदाणीचा वापर करावा. कुलरमधील पाणी काढावे. तसेच फुलदाण्या आणि कुंडयांमध्ये पाणी साचू देवू नये.
शिळे व उघडयावरचे अन्न खाऊ नये. तसेच दूषित मांस व फळे खाऊ नये, डासांच्या अळया पाण्यामध्ये होवू देऊ नये. पिण्याच्या विहिरीजवळ भांडी, कपडे व प्राणी धुवू नये. परिसरात कुठेही सांडपाण्याचे डबके साचू देवू नये, उघडयावर शौचास बसू नये. अनोळखी तथा नवीन विहिरीचे पाणी शुध्द केल्यावर अथवा खात्री झाल्याशिवाय सेवन करु नये, याबाबींची खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.