शहरातील इच्छुक महिलांना रोजगारासाठी
पिंक (गुलाबी) ई- रिक्षा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
अमरावती, दि. 25 (जिमाका) : राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुर्नवसन करणे, स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, स्त्री सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या अमरावती शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शहरातील गरजू महिलांना रोजगारासाठी ‘पिंक (गुलाबी) ई- रिक्षा’ योजना लागू करण्यात आली आहे.
योजनेचे स्वरुप :
ई-रिक्षाची किंमतीमध्ये सर्व करांच्या (जीएसटी, रेजिस्ट्रेशन रोड टॅक्स इ.¬) समावेश असेल. नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका, अनुज्ञेय असलेल्या खाजगी बँकाकडून ई- रिक्षा किंमतीच्या 70 टक्के कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल. राज्य शासन 20 टक्के आर्थिक भार उचलेल, योजनेची लाभार्थी महिला-मुली यांच्यावर 10 टक्के आर्थिक भार असेल, कर्जाची परतफेड करण्याची मुदत 5 वर्षे राहील.
योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता :
लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र रहिवाशी असणे आवश्यक राहील. अर्जदाराचे वय 20 ते 40 वर्षे दरम्यान असणे अनिवार्य आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. विधवा, कायद्याचे घटस्फोटित, राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षणगृह बालगृहातील आजी-माजी प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल. दारिद्रय रेषेखालील महिलांनाही प्राधान्य देण्यात येईल.
योजनेचा अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल कल्याण, जिल्हा परिषद, महिला आर्थिक विकास महामंडळ, सर्व कार्यालय, महिला व बाल विकास भवन, कॅम्प रोड, अमरावती, बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी (पूर्व), बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी (पश्चिम), दत्तापॅलेस गांधी चौक, अमरावती, अधीक्षक, शासकीय मुलींचे निरीक्षणगृह, बालगृह, देसाई ले-आउट, गणेश कॉलनी, जिल्हा समन्वयक महिला सक्षमीकरण केंद्र, वन स्टॉप सेंटर, जिल्हा स्त्री रुग्णालय, अमरावती या कार्यालयातून प्राप्त करुन 7 दिवसात सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.