परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यात 8 भरारी पथके Ø जिल्हाधिका-यांनी घेतला दक्षता समितीचा आढावा

0
80

परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यात 8 भरारी पथके

 

Ø जिल्हाधिका-यांनी घेतला दक्षता समितीचा आढावा

 

चंद्रपूर, दि. 13 : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक (इयत्ता 12 वी) परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10) परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. सदर परीक्षा तणावमुक्त वातावरणात होण्यासाठी तसेच परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यात एकूण 8 भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्हास्तरीय दक्षता समितीचा आढावा घेतला.

 

वीस कलमी सभागृह (जिल्हाधिकारी कार्यालय) येथे आयोजित या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथ.) राजकुमार हिवारे, विस्तार अधिकारी (शिक्षण) सावन चालखुरे आदी उपस्थित होते.

 

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, परिक्षेच्या काळात जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिका-यांनी परीक्षा केंद्रांना भेटी द्याव्यात. तसेच संवेदनशील परीक्षा केंद्रावर जास्त बंदोबस्त ठेवावा. परिक्षेच्या पहिल्या दिवसापासूनच गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शिक्षण विभाग तसेच पोलिस विभागाने सुक्ष्म नियोजन करावे. महत्वाचे तसेच इतर पेपरवेळी भरारी पथकांनी परीक्षा केंद्रांना भेटी देऊन तपासणी करावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी केल्या.

 

असे आहेत भरारी पथक : परिक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकामध्ये शिक्षणाधिकारी (माध्य.) यांचे भरारी पथक, शिक्षणाधिकारी (योजना) यांचे पथक, शिक्षणाधिकारी (प्राथ), उपशिक्षणाधिकारी (माध्य.), महिला अधिकारी वर्ग – 1 यांचे पथक, तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांचे विशेष भरारी पथक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिष्ठाता यांचे विशेष भरारी पथक आणि नागपूर येथील प्रादेशिक विद्या प्राधिकरण उपसंचालक यांच्या कार्यालयातील वर्ग 1 व 2 चे विशेष भरारी पथक यांचा समावेश आहे.

 

जिल्ह्यातील परीक्षा केंद्र व विद्यार्थ्यांची संख्या : इयत्ता 12 वी करीता जिल्ह्यात एकूण 86 परीक्षा केंद्र असून एकूण विद्यार्थी संख्या 28733 आहे. तर इयत्ता 10 वी करीता परीक्षा केंद्रांची संख्या 124 आणि विद्यार्थी संख्या 28266 आहे.

 

जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय दक्षता समिती : जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दक्षता समिती स्थापन करण्यात आली असून इतर सदस्यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधिक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथ.) शिक्षणाधिकारी (योजना) यांचा समावेश आहे. तर शिक्षणाधिकारी (माध्य.) हे समितीचे सदस्य सचिव आहेत.

 

तालुकास्तरीय दक्षता समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी असून इतर सदस्यांमध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, संबंधित पोलिस निरीक्षक असून गटशिक्षणाधिकारी हे सदस्य सचिव आहेत.

 

००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here