*800 वर्षापूर्वीच्या मंदिराचे पुनरुज्जीवन केल्याचा आनंद*  — *सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार*

0
20

*800 वर्षापूर्वीच्या मंदिराचे पुनरुज्जीवन केल्याचा आनंद*

— *सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार*

 

*देवाडा येथे श्री. सिध्देश्वर शिवालय देवस्थानच्या कामाचे भुमिपूजन*

 

*चंद्रपूर, दि. 9 : राजूरा तालुक्यातील देवाडा येथील श्री. सिध्देश्वर मंदीरांचा समूह हा 12 व्या ते 13 व्या शतकातील आहे. पुरातन असलेल्या या मंदिराचे पुनरुज्जीवन आपल्या हातून व्हावे, ही भगवान महादेवाची इच्छा असेल. म्हणूनच सांस्कृतिक कार्य विभागाची जबाबदारी माझ्याकडे आली. या विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या पुरातत्व विभागाच्या माध्यमातून 800 वर्षापूर्वीच्या मंदिराचे पुनरुज्जीवन केल्याचा आपल्याला अतिशय आनंद आहे. विशेष म्हणजे या इश्वरीय कार्याचे आपण सर्वजण साक्षिदार आहोत, अशा भावना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.*

 

राजुरा तालुक्यातील देवाडा येथील श्री. सिध्देश्वर शिवालय देवस्थानच्या मंदीर जतन-दुरुस्ती कामाचे भूमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी वढा येथील श्री. संत स्वामी चैतन्‍य महाराज, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार ॲङ संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर,मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, सहायक संचालक मयूरेश खडसे, सिध्देश्वर शिवालय देवस्थानचे अध्यक्ष राधेश्याम कुर्मावार, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेव, तहसीलदार ओमप्रकाश गौड,देवाडाचे सरपंच शंकर मडावी, सोंडोचे सरपंच जयपाल आत्राम , दिलीप वांढरे , सतीश कोमरपल्लीवार, श्रीनिवास मंथनवार, विनोद नेरदुलवार आदी उपस्थित होते.

 

पहिल्या टप्प्यात 14 कोटी 98 लक्ष रुपये खर्च करून मुख्य मंदीर आणि तीन ज्योतिर्लिंगच्या कामाचे भूमिपूजन झाले, अशी घोषणा करून सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, 800 वर्षापूर्वीच्या या मंदिराला एक इतिहास आहे. हे इश्वरीय काम माझ्या हातून घडावे, अशी भगवान महादेवाचीच इच्छा असेल. म्हणूनच पुरातत्व विभाग येत असलेल्या सांस्कृतिक कार्य विभागाचा मंत्री म्हणून सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. मनात भाव ठेवून मंदिराचे पुननिर्माण करायचे असून 800 वर्षांपूर्वी मंदीर जसे होते, तसेच करण्याचा प्रयत्न आहे.

 

पुढे श्री. मुनगंटीवार म्हणाले, इश्वराने ब्रम्हांड निर्माण केले. ब्रम्हांडात पृथ्वी आहे. पृथ्वीवर अनेक देश असून त्यात भारत हा एक देश आहे आणि भारतामध्ये अध्यात्म आहे, याचा आपल्याला सर्वांना अभिमान आहे. पहिल्या टप्प्यात आज मुख्य मंदीर आणि तीन ज्योतिर्लिंगच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले असले तरी दुस-या टप्प्यात महाशिवरात्रीपूर्वीच इतर कामे करण्यासाठी अतिरिक्त 15 कोटींची त्वरीत मान्यता देण्यात येईल. मंदिरापर्यंत जाण्यासाठी 1 कोटी 25 लक्ष रुपये रस्त्याकरीता मंजूर करण्यात येईल. तसेच रस्त्यावर सोलर लाईट व प्रवेशद्वारासाठी तीर्थक्षेत्र विकास निधीतून 1 कोटी रुपये देण्यात येणार आहे. या परिसरात 1001 बेलाची वृक्षे तर 501 रुद्राक्षाची वृक्षे वनविभागाने त्वरीत लावावीत, अशा सुचनाही पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या.

 

*बांधकामावर नागरिकांनी लक्ष ठेवावे*: जगाच्या कानाकोप-यात भारताचे अध्यात्म पोहचले आहे. जगात सुख शोधण्यासाठी वणवण भटकावे लागते. आपल्या देशात मात्र मंदिरात गेल्यावर सुख आणि समाधान प्राप्त होते. त्यामुळे येथील मंदिराचे बांधकाम अतिशय दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक होण्यासाठी स्थानिक नागरिकांनी या कामावर लक्ष ठेवावे, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

 

*पुर्ननिर्माण अंतर्गत होणारी कामे* : देवाडा येथील मंदीर समुह हा 12 व्या ते 13 व्या शतकातील असून येथे लहान-मोठे मंदिर आहेत. येथील मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ, मंडम अशी आहे. संपूर्ण मंदीर परिसरास प्रकार भिंतीचे अवशेष व त्यास दुमजली प्रवेशद्वार आहे. या मंदिर परिसराच्या पुननिर्माणाकरीता पहिल्या टप्प्यात 14 कोटी 98 लक्ष 56 हजार 971 रुपये मंजूर करण्यात आले आहे. यात प्राथमिक टप्प्यात जतन दुरस्ती करणे, या जतन दुरुस्तीच्या कामामध्ये जुन्या बांधकामाचे ग्राऊटींग करणे, पाया खोदकाम करणे, युसीआर बांधकाम करणे, घडीव दगडी पिल्लर, बीम, पेडेस्टल बसविणे, दगडी स्लॅब इंटरलॉकिंग पध्दतीने बसविणे, गर्भगृहातील शिखराचे बांधकाम करणे, बाहृय क्षेत्रात दगडी स्लॅबचे वॉटरप्रुफ करणे आदी कामे प्रस्तावित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here