जिल्हा प्रशासनाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग
Ø जिल्हाधिकाऱ्यांकडून चंद्रपूर व भद्रावती तालुक्यातील विविध मतदान केद्रांना भेटी
Ø मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर देण्याचे निर्देश
चंद्रपूर,दि.06: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024च्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या पूर्वतयारी करीता जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी चंद्रपूर शहर व भद्रावती तालुक्यातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान केंद्राची पाहणी केली. तसेच सुक्ष्म नियोजन करून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर देण्याचे निर्देश मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., मनपा उपायुक्त अशोक गराटे, तहसीलदार सुभाष पवार, पोलीस निरीक्षक लता वाडीवे, झोनल ऑफिसर श्री. चव्हाण तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, संबंधित पोलीस क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मतदार जागृतीवर भर द्यावा. या निवडणूकीत प्रत्येक मतदान केंद्रावर जास्तीत जास्त मतदान होणे अपेक्षित आहे. यासाठी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी मागील निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी तसेच मतदारांची माहिती ठेवावी. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सायकल रॅली, चर्चासत्र, शालेय उपक्रमातून व्यापक जनजागृती करावी. प्रत्येक मतदान केंद्राची पाहणी करूनच सूक्ष्म नियोजनासह प्लॅन तयार ठेवावा. तसेच मागील निवडणुकांच्या तुलनेत यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सुचना संबंधित केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना दिल्या.
मतदान करण्याकरीता येणाऱ्या मतदारासाठी दिशादर्शक फलक, बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, पार्किंग आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पोलीस विभागाने प्रत्येक मतदान केंद्रावरील पार्किंग व्यवस्थेचा आढावा घेऊन नियोजन करावे. तसेच निवडणुकीमध्ये स्वयंसेवक, एनसीसी व स्काऊट गाईडची मदत घ्यावी, असेही ते म्हणाले.
विविध मतदान केंद्रांना भेट देत पाहणी:
मातोश्री हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तुकूम, जैनुद्दीन जव्हेरी पॉलिटेक्निक, विद्या विहार कॉन्व्हेंट तुकूम, इंडिया कॉन्व्हेंट तुकूम, माउंट कार्मेल कॉन्व्हेंट, भवानजी भाई चव्हाण हायस्कूल चंद्रपूर, स्वर्गीय बाबुरावजी वानखेडे हायस्कूल संजय नगर, राणी राजकुवर हिंदी प्राथ.शाळा एमईएल कॉलनी, वर्धा व्हॅली शिक्षण रयतवारी कॉलरी हायस्कूल, सावित्रीबाई फुले सेमी इंग्लिश महानगरपालिका शाळा बाबूपेठ, महाकाली कॉलरी महानगरपालिका मराठी प्राथमिक शाळा, सिटी माध्यमिक विद्यालय बाबूपेठ, चंद्रपूर तसेच भद्रावती तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा घुटकाळा, लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती, जिल्हा परिषद मराठी तेलगू शाळा माजरी, जिल्हा परिषद हिंदी उच्च प्राथमिक शाळा, माजरी या मतदान केंद्रास जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
00000