बाल आनंद महोत्सव २०२४
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, खेमजई
दि.२३ जानेवारी ते २६ जानेवारी २०२४ पर्यंत दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील बाल आनंद महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले होते.पहिल्या दिवशी दि.२३ जानेवारी २०२४ ला कार्यानुभव विषयांतर्गत कागदकाम आणि मातकाम करण्यात आले.विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंची नंतर प्रदर्शनी लावण्यात आली.प्रदर्शनीचे मूल्यमापन करण्यात आले.त्यानंतर मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले.त्यात बॉल पासिंग,दोरीवरच्या उड्या आणि रिले रेस इ.चा समावेश होता.यात वर्ग १ली ते ७वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
दुसऱ्या दिवशी दि.२४ जानेवारी २०२४ ला आम्ही उद्योजक (खरी कमाई) या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा माधुरीताई चौधरी (शा.व्य.स.अध्यक्षा)होत्या.उद्घाटिका मनिषाताई चौधरी सरपंचा ग्रा.पं.खेमजई या होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रहास मोरे (उपसरपंच),माया ताई झाडे(सरपंचा पोहा), विश्वनाथ तुराणकर(पो.पा.) शंकर धोत्रे (तं.मु.स.अध्यक्ष),नथ्थूजीघरत (सामाजिक कार्यकर्ते)शा.व्य.स.चे सदस्य इ.मान्यवरांनी हजेरी लावली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजू जांभूळे स.शिक्षक यांनी तर आभारप्रदर्शन ईश्वर टापरे स.शिक्षक यांनी केले.या उपक्रमात विद्यार्थ्यांनी नाविण्यपूर्ण १७ स्टॉलची स्वतः कल्पकतेने निर्मिती केली.झुनका भाकर,आलू पराठा,भेळ,बॉईल अंडी, बासुंदी,गूपचूप,आलूबोंडे,आलूभजे, कच्चा चिवडा-नरडे,गुळाचा चहा,निंबूशरबत, कवठाची कळी,मॅगी, मसाला भात कळी,पुरी भाजी, इडली, ब्रेड पकोडे,मठ्ठा इ.खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले. विद्यार्थ्यांनी खाद्य पदार्थांची कृती,महत्व इ.माहिती सांगितली.प्रत्येक स्टॉल प्रमुखांनी मास्टर शेफ कॅप,एपरन आणि हातात हातमोजे घातलेले होते.स्वच्छतेची पूर्ण काळजी विद्यार्थ्यांनी घेतली होती.स्टॉल सजावटीसाठी क्रमांक देण्यात आले.त्यात झुनका भाकर प्रथम क्रमांक,आलू पराठा द्वितीय क्रमांक, भेळ या स्टॉलला तृतीय क्रमांक देण्यात आला. विद्यार्थ्यांनी एकूण ६७४० रू.चे भांडवल उभे केले.एकूण विक्री १३६७५रू.झाली.निव्वळ नफा ६९३५ रू.झाला.या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान मिळाले. विद्यार्थ्यांनी सजवलेल्या स्टॉलला क्रमांक देण्यात आले.त्यात झुनका भाकर प्रथम क्रमांक,आलू पराठा द्वितीय क्रमांक, भेळ तृतीय क्रमांक देण्यात आला.
दि.२६ जानेवारी २०२४ गणराज्य दिन साजरा करण्यात आला.रात्री ७ वा.सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की, संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फक्त विद्यार्थ्यांनीच केले. वैयक्तिक, सामुहिक नृत्य, सामजिक नाटिका ‘मला माणूस बनायचंय’ वर्ग ३,४,५ वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केली.सोबतच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जिवन संघर्ष सांगणारी ऐतिहासिक नाटिका ‘मूकनायक’ सादर करण्यात आली.सादरीकरण वर्ग ६, ७वीच्या विद्यार्थ्यांनी केले.सलग तीन तास मनोरंजन, शिक्षण आणि प्रबोधनाचा सुरेख संगम साधण्यात आला.या कार्यक्रमासाठी गावातील तथा शेजारी गावातून फार मोठा प्रेक्षकवर्ग एकवटला होता.अशाप्रकारे बाल आनंद महोत्सव २०२४ च्या यशात शा.व्य.समिती,ग्रा.पं.खेमजई, गुरुदेव सेवा मंडळ,वीर बिरसा क्रीडा मंडळ, महिला बचतगट आणि खेमजई ग्रामस्थांचा फार मोठा वाटा आहे.मुख्याध्यापक रामकृष्ण बलकी यांच्या नेतृत्वाखाली चेतना मून स.शिक्षिका,अनिल वाघमारे वि.शिक्षक यांनी आपली जबाबदारी पार पाडली.