*ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे दूर झाला चिमुकलीचा श्रवणदोष !*
*पुन्हा मिळाले ऐकण्याचे वरदान,विशेष बाब म्हणून जिल्हा वार्षिक योजनेतून ७ लक्ष ५० हजार रुपये*
*चंद्रपूर, दि. २७* : सात वर्षाच्या चिमुकलीला जन्मापासूनच श्रवणदोष होता. आपल्या लेकीला ऐकायला येत नसल्याचे कळल्यापासून कुटुंबीय हताश होते. एक शस्त्रक्रिया तर आटोपली, पण शंभर टक्के श्रवणदोष दूर होण्यासाठी कॉक्लर न्युक्लियस ८ साऊंड प्रोसेसर घेण्यासाठी आर्थिक अडथळा निर्माण झाला. अशात वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार देवदूतासारखे धावून आले आणि तात्काळ मदतीचे आदेश दिले. आई-वडिलांनी आवाज दिल्यानंतर चिमुकलीने प्रतिसाद दिला आणि कुटुंबियांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा होता.
राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे मुक्काम पोस्ट पिपरी तालुका कोरपना येथील एका सात वर्षीय चिमुकली युवानी तिखट हिला पुन्हा ऐकण्याचे वरदान प्राप्त झाले आहे. ती जन्मापासूनच दोन्ही कानांनी ऐकण्यास असमर्थ होती. युवानीवर कॉक्लर इम्प्लांट सर्जरी करण्यात आली होती. परंतु ऐकू येण्यासाठी न्युक्लियस साऊंड प्रोसेसर इम्प्लांटवर राहणे नितांत गरजेचे होते. शस्त्रक्रियेनंतर मिळालेले साऊंड प्रोसेसर खराब झाल्याने तिला पुन्हा ऐकण्यास अडथळा येऊ लागला. कॉक्लर न्युक्लियस साऊंड प्रोसेसर घ्यायला जवळपास ७ लक्ष ५० लक्ष रुपयांचा खर्च होता. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबियांसाठी एवढा पैसा जमवणे केवळ अशक्य होते.
त्यामुळे तिखट कुंटुंबाने राजुरा येथे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची भेट घेतली. देवराव भोंगळे यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांना यासंदर्भात सहकार्य करण्याची विनंती केली .ना. श्री. मुनगंटीवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता युवानीला आर्थिक मदत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. विशेष बाब म्हणून जिल्हा वार्षिक योजना सन २०२३ -२४ या निधीतून ७ लक्ष ५० हजार रूपये मंजूर करण्याचे आदेश ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. निधी प्राप्त होताच कॉक्लर न्युक्लियस साऊंड प्रोसेसर घेऊन देण्यात आल्याने तिला आता पुन्हा ऐकायला येऊ लागले आहे.
*ना. श्री. मुनगंटीवार नव्हे देवदूतच!*
कॉक्लर इम्प्लांटमुळे १०० टक्के श्रवणदोष असलेल्या मुलांनाही ऐकू यायला लागते. परंतु शस्त्रक्रिया झाल्यानंतर लागण्यात येणाऱ्या कॉक्लर न्युक्लियस साऊंड प्रोसेसर महागडे असल्याने अनेक पालकांपुढे आर्थिक गणित जुळविण्याचे मोठे आव्हान असते. अशात ना. श्री. सुधीर मुनगंटीवार देवदूतासारखे धावून आल्याने युवानीचा आता ऐकता येणे शक्य झाले आहे. तिखट कुटुंबीयांसह कोरपना तालुक्यातील नागरिकांनी देखील ना. श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.