*वरोरा येथे २७ व २८ जानेवारीला धनोजे कुणबी राज्यस्तरीय उपवर – वधू परिचय मेळावा* 

0
35

*वरोरा येथे २७ व २८ जानेवारीला धनोजे कुणबी राज्यस्तरीय उपवर – वधू परिचय मेळावा*

 

*मेळाव्यासाठी १००० हून अधिक उपवर वधूंची नोंदणी*

 

खेमचंद नेरकर

 

*वरोरा*: धनोजे कुणबी समाजातील विवाहच्छुकांना विवाहयोग्य, अनुरुप स्थळे सहज, सुलभरित्या, प्रत्यक्ष संपूर्ण माहितीसह उपलब्ध व्हावीत, या हेतूने धनोजे कुणबी समाज मध्यवर्ती समिती, वरोराद्वारा सन २०१६ नंतर यंदा २७ व २८ जानेवारी २०२४ रोजी येथील धनोजे कुणबी मंगल कार्यालयातील श्री विठ्ठल रखुमाई सभागृहात राज्यस्तरीय उपवर – वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भासह राज्यातील समाजबांधव यात सहभागी होणार असल्याने मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी जय्यत तयारी करण्यात येत असून १००० हून अधिक उपवर तरुण तरुणींची ऑनलाईन नोंदणीही झाली आहे, अशी माहिती तालुका धनोजे कुणबी समाज अध्यक्ष अधिवक्ता गजानन बोढाले व तालुका धनोजे कुणबी समाज आयोजन समितीचे अध्यक्ष बंडू देऊळकर यांनी बघेले लॉन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

आयोजकांनी सांगितले की, मागील अनेक वर्षांपासून धनोजे कुणबी समाजाच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी राज्यस्तरीय उपवर- वधू परिचय मेळावे घेण्यात आले. त्याद्वारे अनेकांचे विवाह जुळवून दिले. सात वर्षांनंतर पुन्हा वरोरा येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. २७ जानेवारीला सकाळी ११.०० वाजता वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येणार असून अध्यक्षस्थान अधिवक्ता गजानन बोढाले भूषविणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार सुदर्शन निमकर, संजय धोटे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमात मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर उपवर – वधू परिचय, चर्चा नंतरच्या सत्रात सांयकाळी ६.०० ते १०.०० वाजताच्या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, २८ जानेवारी रोजी सकाळी १०.०० वाजता राज्यस्तरीय उपवर – वधू परिचयाला सुरुवात होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बंडू देऊळकर भूषविणार असून दंत महाविद्यालय, नागपूरचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमा दरम्यान ” जागृती” या स्मरणिकेचे विमोचन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. याप्रसंगी ‘ समाजभूषण ‘ पुरस्कार विधान परिषद सदस्य आ. सुधाकर अडबोले यांना देण्यात येणार आहे. ‘ मरणोत्तर समाजभूषण ‘ पुरस्कार राज्याचे माजी विधानसभा उपाध्यक्ष अधिवक्ता मोरेश्वर टेमुर्डे आणि खासदार बाळू धानोरकर यांना जाहीर करण्यात आला आहे. यावेळी माजी आमदार वामनराव चटप यांना ‘ समाज गौरव ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. उपवर – वधू परिचय मेळावा आयोजनाच्या या विधायक कार्यास आर्थिकदृष्ट्या हातभार लावण्यासाठी सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या धनोजे कुणबी समाजातील दानशूर व्यक्तींनी स्वयंस्फूर्तीने पुढे येत सहकार्य करावे तसेच समाजबांधवांनी या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष बंडू देऊळकर, वरोरा तालुका धनोजे कुणबी समाज अध्यक्ष अधिवक्ता गजानन बोढाले यांनी केले.

पत्रकार परिषदेत सचिव सचिन जीवतोडे, कोषाध्यक्ष वसंता चवले, अमित आसेकर, धनराज आसूटकर, मुकुंद जोगी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here