मागोवा : वर्षभरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा चढता आलेख
चंद्रपूर, दि. 17: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर कार्यरत आहे.
कायदेविषयक शिबीर:
दि. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 या एक वर्षाच्या कालावधीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर व सर्व तालुका विधी सेवा समितीमार्फत एकूण 313 त्यापैकी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूरमार्फत एकूण 129 कायदेविषयक जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले.
565 व्यक्तींना मोफत विधी सहाय्य:
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,चंद्रपूर आणि सर्व तालुका विधी सेवा समितीमार्फत 565 व्यक्तींना मोफत विधी सहाय्य देण्यात आले. यामध्ये, अनुसूचित जातीचे 11 सदस्य, अनुसूचित जमातीचे 2 सदस्य, महिला 272, बालके 35, तुरुगांतील व्यक्ती 205, विकलांग व्यक्ती 2, तृतीयपंथी 1, विपत्ती, वाशिंक हिंसाचार, जातीय हिंसाचार, नैसर्गिक आपत्ती जसे पुर, दुष्काळ, भुकंप किंवा औद्योगिक आपत्तींना बळी पडलेले व्यक्ती 1, वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी असणारे व्यक्ती 32, आणि इतर 4 असे एकुण 565 व्यक्तींना मोफत विधी सहाय्य देण्यात आले.
लोक अभिरक्षक कार्यालयाची स्थापना:
दि. 13 मार्च 2023 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयातंर्गत लोक अभिरक्षक कार्यालयाची स्थापना करण्यात आली. लोक अभिरक्षक कार्यालयामार्फत फौजदारी प्रकरणातील न्यायालयीन बंदींना मोफत विधी सहाय्य देण्यात येते. आतापर्यंत एकूण 205 अर्ज प्राप्त झाले असून त्यांना मोफत विधी सल्ला व मोफत वकील लोक अभिरक्षक कार्यालयामार्फत तसेच संबंधित तालुका विधी सेवा समितीमार्फत देण्यात आले आहे.
मनोधैर्य योजने अंतर्गत आर्थिक मदत:
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर मार्फत लैंगिक अत्याचारग्रस्त पात्र पिडीतांना मनोधैर्य योजनेअंतर्गत आर्थिक मदत केली जाते. सन 2023 या एक वर्षाच्या कालावधीमध्ये एकूण 91 पिडीतांना अंतरीम रक्कम रु. 20 लक्ष 75 हजार अदा करण्यात आली आहे.
राष्ट्रीय लोक अदालत:
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयामार्फत सन 2023 या एक वर्षाच्या कालावधीमध्ये मुख्यालय व सर्व तालुका न्यायालयात एकूण 4 राष्ट्रीय लोक अदालती घेण्यात आल्या. या लोक अदालतीमध्ये एकूण दाखलपूर्व 4 हजार 453 प्रकरणे तर 4 हजार 661 प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. भूसंपादनाची एकूण 102 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून मोबदल्याची रक्कम रु. 6 कोटी 26 लक्ष 56 हजार 853 रुपये अदा करण्यात आली आहे. मोटार वाहन अपघात नुकसान भरपाईची 66 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून नुकसान भरपाईची रक्कम 5 कोटी 74 लक्ष 55 हजार अदा करण्यात आली आहे. धनादेश अनादरीत झाल्याची 448 प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. तसेच माहे मार्च, जुलै व ऑक्टोबर महिन्यात एकूण 3 विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये भूसंपादन व मोटार वाहन अपघाताची एकूण 33 प्रकरणे निकाली काढण्यात आली.
मध्यस्थी केंद्रातील प्रकरणे:
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर व तालुका विधी सेवा समितीकडे न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे मध्यस्थीसाठी पाठविले जातात. सन 2023 या वर्षात एकूण 1 हजार 540 प्रकरणे मध्यस्थीसाठी पाठवण्यात आली व त्यापैकी 326 प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली. अशी माहिती चंद्रपूर,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी दिली.
00000