पी.एम.जनमन अभियानाच्या माध्यमातून आदीम कोलाम जमातीच्या लाभार्थ्यांना मिळाला लाभ
Ø प्रधानमंत्री मोदी यांचा देशातील लाभार्थ्यांशी संवाद
चंद्रपूर, दि.15: क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या औचित्याने देशातील आदीम जमातीच्या विकासाकरिता पी.एम.जनमन या योजनेची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आहे. यानिमित्त बालाजी सेलिब्रेशन हॉल, गडचांदूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशातील आदीम कोलाम जमातीच्या नागरिकांशी संवाद साधला.
कार्यक्रमाला आमदार सुभाष धोटे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम., उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मीना साळुंखे, राजुराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, कोरपण्याचे तहसीलदार रणजीत यादव, चिमूरचे प्रकल्प अधिकारी प्रवीण लाटकर, नागपूर, सार्वजनिक आरोग्य संस्थेचे संचालक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, आदिवासी सेवक राघोजी गेडाम, बंडू गेडाम यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे म्हणाले, क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून 15 नोव्हेंबर 2023 पासून या योजनांची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, या योजनेची व्यापक अंमलबजावणी करतांना अडचणी नक्कीच येतात. शबरी आदिवासी घरकुल योजनेत रु.1 लक्ष 20 वरून पी. एम. जनमन योजनेत 2 लक्ष 50 हजार रुपये देण्यात येत आहे. या भागातील कोलाम बांधव वनावर प्रेम करतात, त्यामुळेच येथील वन टिकून आहे. त्यासोबतच कोलाम समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून प्राधान्याने व्हावा, असेही ते म्हणाले.
उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू म्हणाल्या, कोलाम जमातीच्या विकासाकरीता प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम. यांच्या मार्गदर्शनात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने व अन्य विभागाच्या सहकार्याने 3 जानेवारीपासून विविध शिबिरांच्या माध्यमातून व कोलाम नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन योजनेचा लाभ दिला.
प्रास्ताविकेत बोलतांना सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम. म्हणाले, कोरपना, राजुरा, वरोरा व जिवती या तालुक्यात 8 हजारच्या वर आदीम कोलाम जमातीचे वास्तव्य आहे. येथील आदीम कोलाम जमातीच्या नागरिकांना आधारकार्ड, घरकुल योजना, जात प्रमाणपत्र, बँक खाते, किसान क्रेडिट कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, उत्पन्न दाखला, अधिवास प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजना तसेच आरोग्य तपासणी अशा विविध सुविधा व दाखले देण्यात येत आहे. आजपर्यंत एकूण 8 हजार 934 विविध दाखले काढण्यात आल्याचेही ते म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा लाभार्थ्यांशी संवाद : यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील छत्तीसगड राज्यातील जशपूर, मध्यप्रदेश राज्यातील शिवपुरी, महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, आंध्रप्रदेश तसेच झारखंड राज्यातील जुमला येथील आदिम जमातीच्या लाभार्थ्यांची संवाद साधला.
विविध योजनांची दालने : सदर कार्यक्रमात प्रधानमंत्री उज्वला योजना, आयुष्मान कार्ड, आधार कार्ड, आरोग्य विभागामार्फत क्षयरोग, हिवताप, हत्तीरोग, सिकलसेल, मलेरिया आणि कुष्ठरोग, मोफत आरोग्य तपासणी आदी दालने उभारण्यात आली होती.
प्रमाणपत्रांचे वितरण : राजुरा, जिवती, कोरपना व वरोरा तालुक्यातील आदिम कोलाम जमातीच्या नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राजुरा तालुक्यातील सुरेश आत्राम, मेघू आत्राम, तुकाराम कुमरे, तसेच जिवती तालुक्यातील मारूबाई कोडापे, अनुबाई मडावी, आयुष आत्राम या लाभार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. तसेच संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेत मोतीराम मडावी, कमलबाई आत्राम, कनू मडावी, पग्गुबाई मडावी तर वनहक्क पट्टे वितरणात रामा सिडाम, भीमबाई कोडापे, लक्ष्मण मडावी आदी कोलाम जमातीच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
घरकुलाचे वाटप : जिवती तालुक्यातील मोतीराम मडावी, माणिकराव मडावी, नामदेव कोडापे यांना घरकुल प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
आयुष्मान भारत कार्डचे वितरण : कोरपना तालुक्यातील विनोद टेकाम, बाळू टेकाम, शंकर सिडाम, देवराव मडावी या लाभार्थींना आयुष्यमान भारत कार्डचे वितरण करण्यात आले. तर वरोरा तालुक्यातील जयंता टेकाम, मंदा टेकाम,राजकुमार रामगडे, प्रेमीला आत्राम या लाभार्थींना नव्याने आधारकार्डचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
न्यूक्लिअस बजेट अंतर्गत साहित्याचे वितरण : जिवती तालुक्यातील आदिम कोलाम कृषी किसान पुरुष बचत गटास न्यूक्लिअस बजेट अंतर्गत ट्रॅक्टर व ट्रॉली तर श्यामदादा महिला स्वयंसहायता समूह बचत गटास मालवाहक चारचाकी वाहनाचे वितरण करण्यात आले.
०००००००