शेतकऱ्यांसाठी राज्याबाहेर अभ्यास दौऱ्याचे आयोजन
Ø इच्छूक शेतकऱ्यांकडून 22 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित
चंद्रपूर दि. 11: एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2023-24 करीता जिल्ह्यातील 25 शेतकऱ्यांना परराज्यात अभ्यास दौऱ्यावर जाण्याची संधी कृषी विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर अभ्यास दौऱ्यात सहभाग घेण्यास इच्छूक शेतकऱ्यांनी 22 जानेवारी 2024 पर्यंत संबधित तालुका कृषि अधिकारी किंवा उपविभागीय कृषि अधिकारी यांचेकडे अर्ज, सातबारा, 8-अ, आधारकार्ड व छायाचित्रासह अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्याबाहेर भेट हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमातंर्गत शेतकऱ्यांमध्ये फलोत्पादन विषयक जिज्ञासा, आवड निर्माण करण्याच्या हेतूने फलोत्पादनाची प्रतवारी, हाताळणी, शेत स्तरावर करावयाची प्रक्रिया, उद्योग-व्यवसाय स्थापन करणे, फलोत्पादनाच्या विपणन व्यवस्थेबाबत अभ्यास करणे, आधुनिक लागवड व काढणीपश्चात तंत्रज्ञानाबाबत सखोल शास्त्रोक्त ज्ञान उपलब्ध करून देणे. तसेच या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वत:बरोबरच समुहाची फलोत्पादन शेती उन्नत करणे या बाबीसाठी शेतकऱ्यांचा राज्याबाहेर दौरा आयोजित करण्यात आला आहे.
या दौऱ्यात फळबाग, भाजीपाला, फुले लागवड, विदेशी फळपिक लागवड, शेडनेट गृह व हरितगृह उभारणी, फळप्रक्रिया आदीबाबतचे आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेता येणार आहे.
00000