*आशिष रा. यमनुरवार जिल्हा प्रतिनिधी खरे वृतांत*
*विद्यार्थ्यांनी सर्व स्तरावर यशस्वी होण्यासाठी यूपीएससीची तयारी करावी – कुलदीप कोटंबे*
*महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन*
कोरपना – सेवा कलश फाउंडेशन राजुराच्या वतीने महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी व युपीएससी मार्गदर्शन कार्यक्रम सोमवारी पार पडला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून एक्सलेंस आयएएस अकॅडमी पुणे येथील संस्थापक कुलदीप कोटंबे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या स्मिता चिताडे उपस्थित होत्या. तर विशेष अतिथी म्हणून संस्थेचे सचिव धनंजय गोरे, सेवा कलश फाउंडेशन, राजुराचे अध्यक्ष अभिजीत धोटे, राहुल बजाज, महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्सचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव, उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे मंचावर उपस्थित होते.
सध्याची स्पर्धा परीक्षा ही देशस्तरीय असून प्रत्येक राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी आपण केली पाहिजे. त्यासाठी भारताचा इतिहास, भारताचा भूगोल, भारताचे अर्थशास्त्र व सामान्य ज्ञान यावर विद्यार्थ्यांनी भर देऊन सतत वाचन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कुलदीप कोटंबे यांनी केले. अध्यक्ष भाषणातून बोलताना प्राचार्य स्मिता चिताडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी सक्षम असताना सुद्धा मार्गदर्शनाच्या अभावामुळे ते योग्य पदावर पोहोचू शकत नसल्याची खंत व्यक्त केली. मात्र काहीतरी करण्याचे ध्येय असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आमची शाळा उत्तरोत्तर कार्य करत राहील असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून सेवा कलश फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत सुभाष धोटे यांनी ग्रामीण विद्यार्थी स्पर्धेत टिकायला हवे यासाठी काही तांत्रिक गोष्टी विद्यार्थ्यांना माहीत असाव्या लागतात. मात्र त्याचा अभाव आपल्याकडील विद्यार्थ्यांमध्ये आहे. अशा मार्गदर्शनातूनच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेल्या शंकांचे निराकरण होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. आशिष देरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.