जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑटो रिक्षा चालकांची नेत्र तपासणी व चष्म्यांचे वितरण
Ø प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा उपक्रम
चंद्रपूर, दि. 06: प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि सामान्य रुग्णालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ऑटोरिक्षा चालकांसाठी नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित शिबिरामध्ये साधारणतः 200 ऑटो चालकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तर प्रातिनिधिक स्वरूपात दहा ऑटो चालकांना जिल्हाधिकारी विनय गौडा व पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम, मोटार वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक दीपक काळे, सुनील पायघन, विष्णु कुंभलकर, दुर्गा चौरे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील ऑटो रिक्षा चालकांसाठी नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर दि. 6 ते 8 डिसेंबर 2023 या कालावधीत प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे राबविण्यात येत आहे.
यावेळी,उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, ऑटो रिक्षा चालकांनी वाहतुकीचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच स्वतःच्या आरोग्याच्या काळजी सोबतच प्रवाशांची देखील काळजी घ्यावी. प्रवाशांना सौजन्याने वागणूक द्यावी, असे ते म्हणाले. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी म्हणाले, ऑटो रिक्षा चालकांना शिस्त लावण्यासाठी कार्यवाही करण्यात येते. मात्र, ते स्वयंशिस्त झाल्यास कार्यवाहीची गरजच पडणार नसल्याचे ते म्हणाले