गुणवत्ता तपासूनच ‘त्या’ लिफ्टचे अंतिम देयक अदा होणार
Ø सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे स्पष्टीकरण
चंद्रपूर, दि 04 : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट गोदाम इमारतीमध्ये, सार्वजनिक बांधकाम (विद्युत) विभागीय कार्यालयाकडून लिफ्ट लावण्याचे काम करण्यात येत आहे. सदर काम पूर्ण झाल्यानंतर त्याची गुणवत्ता तपासूनच अंतिम देयक संबंधित कंत्राटदाराला अदा करण्यात येईल, असे स्पष्टीकरण सा.बा. (विद्युत) विभागाच्या कार्यकारी अभियंता पूनम वर्मा यांनी दिले आहे.
ईव्हीएम – व्हीव्हीपॅट गोदाम इमारतीमध्ये लिफ्ट लावण्याचे काम ठाणे येथील मे. अविन्यटेक एलीव्हेटर्स प्रा. लि. या कंपनीला देण्यात आले आहे. सदर कंत्राटदाराने लिफ्ट व त्यासाठी लागणारे सर्व साहित्य कामाच्या ठिकाणी उपलब्ध केले आहे. विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागल्यामुळे ईव्हीएम-व्हीव्हीपॅट गोदामाच्या परिसरात बाहेरील कोणत्याही व्यक्तिला प्रवेश नसल्याने लिफ्ट लावण्याचे काम थांबविण्यात आले. संबंधित कंत्राटदाराने कामाच्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या तसेच लिफ्टच्या साहित्यावर झालेल्या खर्चाचे देयके 16 डिसेंबर 2024 रोजी कार्यालयास सादर केले.
त्या अनुषंगाने सादर केलेल्या साहित्याच्या देयकानुसार विभागीय कार्यालयाकडून 18 डिसेंबर 2024 रोजी मोजमाप नोंदवून संबंधित कंत्राटदाराला 24 डिसेंबर 2024 रोजी केवळ साहित्याच्या खर्चाचे चालू देयके देण्यात आले. अद्यापर्यंत सदर कामाचे अंतिम देयक अदा करण्यात आले नाही. काम पूर्ण झाल्यानंतरच त्याची गुणवत्ता तपासून अंतिम देयक अदा करण्यात येणार आहे.
तसेच लिफ्ट पीटसाठी असलेला खड्डा हा आवश्यक असलेल्या मापदंडापेक्षा जास्त असल्याने काही अंतरापर्यंत भरून देण्याबाबत स्थापत्य विभागाला कळविण्यात आले आहे. स्थापत्य विभागाला याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पीटसाठी असलेल्या खड्ड्याचे काम 28 जानेवारी 2025 पासून चालू करून तसेच पूर्ण करून घेण्यात आले आहे. लिफ्टच्या समोरील दरवाजाच्या भिंतीचे बांधकाम स्थापत्य विभागाकडून चालू असून ते पूर्ण होताच लिफ्टचे काम देखील पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे वरील काम अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही तसेच सदर कामाचे पूर्ण देयक सुध्दा अदा करण्यात आले नाही, असे सा.बा. (विद्युत) विभागाच्या कार्यकारी अभियंता पूनम वर्मा यांनी कळविले आहे.
००००००