विजयाची मशाल वर्षभर धगधगती ठेवण्याचा संकल्प करा*

0
80

*-पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे खेळाडूंना आवाहन*

*बल्लारपूर येथे राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन*

*ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे तालुका स्तरावर प्रथमच राज्यस्तरीय स्पर्धा*

*चंद्रपूर, दि. 30* : राज्याच्या एका टोकाला असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील छोट्याशा तालुक्यात आज राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा होत आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र एवढ्यावरच न थांबता भविष्यात येथे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे. आज पेटविलेली मशाल केवळ एका स्पर्धेपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक खेळाडूने वर्षभर विजयाची मशाल स्वत:च्या मनात धगधगती ठेवून उत्कृष्ट कामगिरी करावी, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकूल येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, तहसीलदार डॉ. कांचन जगताप, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, जिल्हा ॲथलॅटिक्स असोसिएशनचे सचिव सुरेश अडपेवार, परभणीचे जिल्हा क्रीडा अधिकारी जयंत टेंभरे, क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे, अरुणा गंधे, पुनम नवघरे, श्री. पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील उदयोन्मुख खेळाडू वाघाच्या भुमीत आले आहेत. यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी आणि संपूर्ण टीमचे विशेष अभिनंदन. भविष्यात चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

ते पुढे म्हणाले, ‘मशालीची आग कायम धगधगती ठेवण्याचा संकल्प खेळाडूंनी करावा. प्रत्येक स्पर्धेत पराक्रम करून मी विजय मिळविणारच, या उद्देशाने खेळाडूंनी वाटचाल करावी. राज्य शासन खंबीरपणे खेळाडूंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील. वाघाच्या भूमित सर्व खेळाडू आले आहात, परत जाताना वाघासारखा पराक्रम आणि स्पर्धेचा आनंद सोबत घेऊन जा,’ असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले. तत्पूर्वी, ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रतिमा पुजन आणि दीप प्रज्ज्वलनानंतर क्रीडा ज्योत प्रज्ज्वलित करण्यात आली.

जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी प्रास्ताविक करताना पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे स्पर्धा होत असल्याचे नमूद केले. ‘ना. श्री. मुनगंटीवार यांच्यामुळे प्रथमच तालुकास्तरावर राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन होत आहे. राज्यातील सर्वांत उत्कृष्ट तालुका क्रीडा संकूल विसापूरमध्ये आहे. क्रीडा क्षेत्रावर केलेला खर्च हा सुवर्ण पदकांच्या स्वरुपात भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे,’ असे ते म्हणाले.

*ऑलिम्पिकचे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवा*
‘2036 मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे. जागतिक स्तरावरच्या या स्पर्धेत आपल्या खेळाडूंना जास्त पदके मिळवता आली नव्हती. मात्र अलीकडेच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. क्रीडा क्षेत्राकडे सरकार विशेष लक्ष देत असून सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देत उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने डोळ्यापुढे ऑलिम्पिकचे लक्ष्य ठेवावे,’ असे आवाहन ना. श्री. मुनगंटीवार यांनी केले.

*क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास*
राज्यात तीन स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक आहेत आणि तिन्ही ट्रॅक आपल्या जिल्ह्यात म्हणजे चंद्रपूर येथील क्रीडा संकुलात, विसापूर क्रीडा संकूल आणि सैनिक स्कूलमध्ये आहेत. याशिवाय पोलिसांचे सर्वोत्तम जीम आपल्या जिल्ह्यात आहे. चंद्रपूर, बल्लारपूर, मूल, पोंभुर्णा आदी ठिकाणी उत्तम स्टेडीयम उभारण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.

*खेळाडूंना मोफत ताडोबा सफारी*
जगातील 193 देशांपैकी 14 देशात वाघ आहेत. त्यापैकी 65 टक्के वाघ भारतात असून सर्वाधिक वाघ हे फक्त चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. त्यामुळे राज्यभरातून येथे आलेल्या खेळाडूंना ताडोबाची मोफत जंगल सफारी दाखविण्याचे नियोजन करावे, अशा सुचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिल्या.

*उत्तम व्यवस्थेबाबत सूचना*
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेकरीता चंद्रपूरमध्ये आलेले खेळाडू, त्यांचे पालक व मार्गदर्शकांची राहण्याची व जेवण्याची उत्तम व्यवस्था करावी. प्रत्येक खेळाडू येथून आनंद घेऊनच परत गेला पाहिजे, अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्या.

*दिमाखदार उद्घाटन सोहळा*
विसापूर येथील क्रीडा संकूलात राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेचे अतिशय आकर्षक आणि मनमोहक पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. यात राज्याच्या संस्कृतीची झलक गोंधळ व देवीचा जागरमधून सादर करण्यात आली. तसेच लाठी-काठी मार्च, व आतषबाजीने उपस्थितांची मने जिंकली.

*600 खेळाडू व 700 पालकांचे आगमन*
राज्यातील आठ महसूल विभाग तसेच पुणे येथील क्रीडा प्रबोधिनी अशा एकूण 9 विभागांमधून 1600 खेळाडू आणि त्यांच्यासोबत 700 पालक राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी विसापूर येथे आले आहेत. तीन दिवस 100, 200, 400, 800, 1500 आणि 3000 मीटर धावणे, गोळाफेक, थाळीफेक, उंच उडी, लांब उडी, हॅमर थ्रो, भालाफेक, क्रॉसकंट्री या स्पर्धा होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here