वन अकादमीत अरुणाचल प्रदेश वनविभागातील वनपालांनी घेतले पायाभुत प्रशिक्षण
Ø 45 पुरुष वनपाल तर चार महिला वनपाल प्रशिक्षणार्थींचा समावेश
चंद्रपूर, दि. 13 : भारतातील विविध राज्यातील वन विभाग तसेच इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पायाभूत प्रशिक्षण देण्यासाठी चंद्रपूर येथे सुसज्ज वन अकादमीची निर्मीती करण्यात आली आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून ही वास्तू उभी राहिली आहे. अरुणाचल प्रदेश वनविभागातील 49 वनपालांचे 6 महिने कालावधीचे पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात चंद्रपूर वन प्रबोधिनी येथे 03 जून 2024 पासून करण्यात आली होती. या प्रशिक्षणामध्ये अरुणाचल प्रदेश वन विभागातील 49 वनपाल प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये 45 पुरुष आणि 04 महिला वनपाल प्रशिक्षणार्थींचा समावेश होता.
गत सहा महिने प्रबोधिनीत प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर नुकत्याच झालेल्या दीक्षांत समारंभात 49 वनपालांनी पासींग आऊट परेड(Passing Out Parade) प्रदर्शित केली. यावेळी, महाराष्ट्र वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) श्रीनिवास राव, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) तथा वन अकादमीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी या परेडचे निरीक्षण करुन वनपाल प्रशिक्षणार्थींची मानवंदना स्विकारली.
यावेळी अरुणाचल प्रदेशचे पर्यावरण, वन आणि हवामान बदलचे सल्लागार वांगकी लोवांग, तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) अरुणाचल प्रदेश पी. सुब्रमण्यम, दुरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
पर्यावरण, वन आणि हवामान बदल अरुणाचल प्रदेशचे सल्लागार वांगकी लोवाँग यांनी वनपाल प्रशिक्षणार्थींना 6 महिन्याचे प्रशिक्षण कालावधीत चंद्रपूर, वन अकादमी येथे दिल्या गेलेले प्रशिक्षण, पुरविण्यात आलेल्या सोयी-सुविधा तसेच प्रशिक्षणा दरम्यान महाराष्ट्र, तेलंगना, आंध्रप्रदेशातील अभ्यास दौऱ्यात वनपाल प्रशिक्षणार्थींनी अध्ययन केलेल्या विशेष बाबींचे सादरीकरण केले. अरुणाचल प्रदेशचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) पी. सुब्रमण्यम यांनी चंद्रपूर वन अकादमी येथे वनपाल प्रशिक्षणार्थींना उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिल्याबद्दल वन अकादमीचे आभार व्यक्त केले. तसेच माहे फेब्रुवारी 2025 पासून पुन्हा नवीन 50 अप्रशिक्षित वनपाल तुकडीस प्रशिक्षणासाठी चंद्रपूर वन अकादमी येथे पाठविण्याचे जाहिर केले.
प्रशिक्षणार्थी वनपालांना प्रमाणपत्र वितरण : यावेळी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) तथा वन अकादमीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक, अशोक खडसे, अपर संचालक मनिषा डी. भिंगे, सत्र संचालक संजय एस. दहिवले यांच्या हस्ते प्रशिक्षण पुर्ण केलेल्या 49 वनपालांना प्रमाणपत्र तसेच विशेष प्राविण्य प्राप्त प्रशिक्षणार्थ्यांना पदक देवून सन्मानित केले. तसेच वनपालांना मार्गदर्शन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.