*आमचा जाहीरनामा राज्याच्या प्रगतीचा गेम चेंजर ठरणार*
*ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास*
*बल्लारपूर मतदारसंघ महाराष्ट्रात ठरणार अग्रेसर*
*मुल, दि.२८ – विकासाच्या बाबतीत मुल, पोंभुर्णा, बल्लारपूर हा विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रात अग्रेसर आहे. तो कायम अग्रेसर रहावा यासाठी जनता पाठीशी आहे. जनतेच्या सूचनांमधूनच निवडणुकीचा जाहीरनामा तयार करण्यात आलेला आहे. हा जाहीरनामा राज्याच्या प्रगतीचा गेम चेंजर ठरणार आहे, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.*
ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सोमवारी (ता.२८) अर्ज भरला. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘महाराष्ट्र राज्याच्या विकासाचा आणि प्रगतीचा जाहीरनामा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने मांडला आहे. आमचा जाहीरनामा हा केवळ जाहीरनामा नाही तर रयतेचे वचन पत्र आहे. या वचनपत्राला जनताही डोक्यावर घेईल.’ राज्यातील महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. राज्यातील लाडक्या बहिणी आपल्या लाडक्या भावांचे महायुतीचे सरकार पुन्हा राज्यात आणण्यासाठी भाजपा महायुतीला निवडून देतील हा विश्वास आहे, असेही ना.मुनगंटीवार म्हणाले.
माझ्या मतदारसंघाशिवाय स्टार प्रचार म्हणूनही माझ्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. या मतदारसंघातून जास्तीत जास्त वेळ काढून मी इतर मतदारसंघात प्रचार करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्याचा सांस्कृतिक मंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत जाहीर करण्याचे भाग्य लाभले. दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा हा विश्वास राज्य गीतातून महाराष्ट्राला दिलेला आहे. त्याच दिल्लीतील सरकारचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीचे स्थिर सरकार आम्ही आणणार आहोत, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणून या क्षेत्राचा सामाजिक, आर्थिक आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्याकडे विशेष भर दिला. विविध समाजाच्या हक्काचे समाजभवन गावागावांमध्ये निर्माण करण्यात आले. ग्रामिण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि बळकट करण्यासाठी ग्रामिण आरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण केले. विविध रोजगाराभिमुख प्रकल्पांच्या माध्यमातून क्षेत्रातील गावागावांतील हजारो युवक, महिला, नागरिकांना हक्काचे रोजगार देण्याचेही काम झाले. याशिवाय गावागावांमध्ये रस्ते आणि पुलांचे जाळे निर्माण करून पायाभूत सुविधांना उभारी देण्याचे काम केले. या सर्व कामांमुळे जनतेच्या जीवनात सुलभता आली आहे. त्यामुळे जनता जनार्दन यावेळी देखील खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी राहिल. केवळ बल्लारपुरमध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यातील जनता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीशी राहिल, असाही विश्वास ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.