*कामडे खून प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा करा*
*मुल येथील घटनेनंतर पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश*
*मुल, दि.१४ – मुल येथे रविवारी (दि.१३ ऑक्टोबर) रात्री क्षुल्लक कारणांवरून झालेल्या खुनाचा तातडीने तपास लावून गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याचे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.*
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांनी पूर्ण काळजी घ्यावी आणि आरोपींना कठोर शिक्षा होईल, यादृष्टीने पावले उचलावीत, अशा सूचनाही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये प्रेम कामडे या युवकाचा मृत्यू झाला. तर दोन लोक जखमी झाले. अशी माहिती समोर येत आहे.
या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश ना. श्री. मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासन तथा पोलीस प्रशासनाला दिले आहेत. कारवाई करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले. त्याचवेळी मृताच्या परिवाराच्या दुःखात आपण सहभागी असून त्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही ना. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.