*केवळ दीड महिन्यात मिळाली महावितरणच्या नवीन उपविभागाला मंजुरी*
*ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याचे फलित*
*ग्राहकांच्या सोयीसाठी ताडाळी उपविभाग निर्मितीचा मार्ग मोकळा*
*चंद्रपूर, दि.10 – राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केवळ दीड महिन्यात महावितरणच्या नवीन उपविभागाला मंजुरी मिळाली आहे. महावितरणच्या चंद्रपूर मंडळांतर्गत सध्याच्या चंद्रपूर ग्रामीण उपविभागातील घुग्घुस शाखा व चंद्रपूर ग्रामीण शाखेची पुनर्रचना करून नवीन ताडाळी उपविभागाचा मार्ग मोकळा झाला आहे. महावितरणच्या तडाळी उपविभागासाठी ना. श्री. मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच 16 ऑगस्ट 2024 रोजी पत्र लिहिले होते. पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळेच केवळ दीड महिन्यात ताडाळी उपविभागाला मंजुरी मिळाली आहे.*
महावितरणच्या चंद्रपूर विभागांतर्गत ग्रामीण उपविभागात घुग्घुस शाखा व चंद्रपूर ग्रामीण शाखा अस्तित्वात असून घुग्घुस शाखेअंतर्गत दोन 33 केव्ही उपकेंद्र, 31 गावे आणि 16122 ग्राहक जोडले आहेत. तर चंद्रपूर ग्रामीण शाखेअंतर्गत चार उपकेंद्रे, 46 गावे आणि 12764 इतके ग्राहक जोडले आहेत. दोन्ही शाखा कार्यालयांचे भौगोलिक क्षेत्र अतिशय मोठे असून बराचसा भाग जंगलव्याप्त आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वीज विषयक तक्रारींचे निवारण करण्यास विलंब होतो. तसेच कामावर नियंत्रण ठेवणे कठीण जात असून ग्राहकांना जलद सेवा पुरविण्यास अडचण निर्माण होते.
*उत्तम ग्राहकसेवेसाठी*
ताडाळी शाखा कार्यालय निर्माण झाल्यास घुग्घुस आणि चंद्रपूर ग्रामीण या शाखा कार्यालयांचे क्षेत्रफळ कमी होईल व कामामध्ये सुसंगती येण्यास मदत होईल. परिणामी ग्राहकांना चांगली सेवा देता येईल आणि वीज गळती, वीज चोरी, महसूल वसुली इत्यादी कामे शक्य होईल. ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महावितरण कंपनीचा ताडाळी उपविभाग निर्माण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून केवळ दीड महिन्यात ताडाळी शाखा कार्यालय निर्माण करण्यास मंजुरी मिळाली आहे.
*असा राहणार ताडाळी उपविभाग*
सद्यस्थितीत घुग्घुस शाखा व चंद्रपूर ग्रामीण शाखा मिळून एकूण 28886 ग्राहक आहेत. महावितरणने प्रसारीत केलेल्या मानकांप्रमाणे प्रत्येक शाखेत 7500 ग्राहक असणे आवश्यक आहे. ताडाळी उपविभाग निर्माण झाल्यास घुग्घुस शाखेमध्ये 10490 ग्राहक, चंद्रपूर ग्रामीण शाखेमध्ये 9660 ग्राहक तर नवीन ताडाळी शाखेमध्ये 8736 ग्राहकसंख्या राहणार आहे. तसेच ताडाळी शाखेमध्ये एकूण गावांची संख्या 35 तर संलग्न उपकेंद्राची संख्या 2 राहील.