आदिवासी विकास मंत्र्यांच्या हस्ते शासकीय आश्रम शाळा व वसतिगृह बांधकामाचे आभासी भूमिपूजन
चंद्रपूर, दि. 10 : देवाडा येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा येथील मुलींचे वसतिगृह आणि बोर्डा येथील शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा येथील शाळा इमारतीचे भूमिपूजन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते आभासी पध्दतीने करण्यात आले. यावेळी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, गावातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
शासकीय आश्रम शाळा बोर्डा (कन्या शाळा) येथे सध्या शालेय इमारत, टिनाच्या शेडमध्ये असून 1 ते 12 वर्गापर्यंत सुरू आहे. नवीन शालेय इमारत ही तीन मजली असून बांधलेले क्षेत्र 2524.06 चौ.मी. आहे. त्यानुसार प्रकल्प अधिकारी यांच्या मागणीनुसार शालेय इमारत प्रास्ताविक करण्यात आली. शासकीय आश्रम शाळा देवाडा येथे वसतिगृहाकरीता 300 मुलींची क्षमता मंजूर आहे. नवीन शालेय इमारत ही तीन मजली असून बांधलेले क्षेत्र 2217.60 चौ. मी. आहे. त्यानुसार प्रकल्प अधिकारी यांच्या मागाणी नुसार मुलींचे वसतिगृह इमारत प्रस्तावित करण्यात आले.
यावेळी आभासी पध्दतीने मार्गदर्शन करतांना डॉ विजयकुमार गावित म्हणाले, आदिवासी समाज हा प्रगतशील म्हणून समोर येणे आवश्यक आहे. त्याकरीता संपूर्ण महाराष्ट्रात 120 नवीन शालेय इमारत व वसतिगृहाच्या बांधकामाकरीता 2300 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांना प्रशिक्षण देणे, ई- लायब्ररी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संपूर्ण जगाची माहिती शाळेत देणे, 50 टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी 1 हजार क्षमतेचे मुलांचे शासकीय वसतिगृह आणि 500 क्षमतेचे मुलींचे शासकीय वसतिगृह बांधकामास मंजूरी, इयत्ता 5 वीत प्रज्ञावंत विद्यार्थ्याकरिता स्पर्धा परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षणाकरिता निवड करणे, पी. एच.डी तसेच इतर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अनुसूचित जमातील विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिष्यवृत्ती देणे, आदिवासी शेतकरी तसेच व्यवसाय करू इच्छिणा-या व्यावसायिकांसाठी आर्थिक मदत देणे, अशा विविध योजना आदिवासी विकास विभाग राबवित असल्याचे त्यांनी सांगितले .
प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, सहायक प्रकल्प अधिकारी डी.के. टिंगुसले, जी. एम. पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी आर. एस बोंगिरवार, आर.टी. धोटकर, महेश गिरडकर, प्रिती कुत्तरमारे, मुख्याध्यापिका श्रीमती रिंगणे, मुख्याध्यापिका श्रीमती राऊत, तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा देवाडा व बोर्डा येथील सर्व शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.