*चंद्रपूरला औद्योगिकदृष्ट्या प्रगतीपथावर नेण्यासाठी कटिबद्ध*

0
31

*चंद्रपूरला औद्योगिकदृष्ट्या प्रगतीपथावर नेण्यासाठी कटिबद्ध*

 

*-ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास*

 

*इंडस्ट्रियल इस्टेट येथे 4.50 कोटी रूपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे व विविध विकासकामांचे भूमिपूजन*

 

*चंद्रपूर, दि. 8: चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. देशाच्‍या विकासात चंद्रपूरची भूमिका महत्‍त्त्वाची आहे. जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. जिल्हा औद्योगिकदृष्ट्या पुढे जावा या दृष्टीने मार्च महिन्यामध्ये ॲडव्हान्टेज चंद्रपूरचे आयोजन केले गेले. या ॲडव्हान्टेज चंद्रपूर मध्ये विविध कंपन्यांनी सामंजस्य करार (MOU) केलेत. त्याचा लाभ स्थानिक परिसराला प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्ष रोजगार निर्मितीतून होईल. यातून देशाच्‍या विकासात हातभार लागणार असून चंद्रपूर औद्योगिकदृष्ट्या प्रगतीपथावर नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.*

 

चंद्रपूर इंडस्ट्रियल इस्टेट येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, इंडस्ट्रियल इस्टेटच्या अध्यक्षा कल्पनाताई पलीकुंडवार, उपाध्यक्ष पदमकुमार नायर, भाजपा महानगर अध्यक्ष राहुल पावडे, मनोज सिंघवी, सुभाष कासनगोट्टूवार तसेच इंडस्ट्रियल इस्टेटचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील विकासासाठी योगदान देण्याची इच्छा मनात होती, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘पोंभुर्ण्यामध्ये 5 हजार एकरवर एमआयडीसी स्थापन करण्यात येत आहे. लक्ष्मी मित्तल ग्रुप 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून देशातला नव्हे तर आशियातला सर्वात मोठा स्टील प्लांट टाकू इच्छितात. त्‍या माध्‍यमातून प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्ष रोजगार निर्मिती केली जाईल, त्यादृष्टीने प्रवास सुरू झाला आहे. या माध्यमातून हा जिल्हा महाराष्ट्रात निश्चितपणे पुढे जाईल, असा विश्वास ना.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

 

या जिल्ह्यातील महामार्ग, समृद्धी महामार्ग पोंभुर्णा ते गडचांदूरपर्यंत जोडण्यात येत आहे. कमी कालावधीमध्ये मुंबईपर्यंत वेगाने प्रवास करता येईल यादृष्टीने कार्य केले जात आहे. तेलंगणा राज्याशी व्यावसायिक, व्यापारी आणि औद्योगिक संबंध प्रस्थापित करता यावे यासाठी नागपूर-हैदराबाद ही वंदे भारत ट्रेन जोडण्याचे कार्य केले. वंदे भारत ट्रेनला नागपूर-सिकंदराबादच्या मध्ये चंद्रपूर व बल्लारशा येथे थांबा देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

 

ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, कौशल्य विकास उद्योगांमध्ये यावे या दृष्टीने एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे 600 कोटी रुपयांचे उपकेंद्र तयार होत आहे. ज्यामध्ये महिलांना 62 प्रकारच्या कोर्सेसचे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. जिल्ह्यातील आय.टी.आय. मधून उद्योगांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ प्राप्त व्हावे यासाठी आय.टी.आय. अत्याधुनिक करण्यात येत आहे. बल्लारपूरचे आय.टी.आय. मॉडेल करण्यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचेही ते म्हणाले.

 

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत कुशल मनुष्यबळ उद्योगधंद्यांना पुरविण्यात येत आहे, औद्योगिक आस्थापनांनी त्यांच्या ज्ञानाचा, परिश्रमाचा आणि कष्टाचा उपयोग उद्योग वाढीसाठी करू शकतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये अनेक शैक्षणिक संस्था आणल्या. सर्वप्रथम अभियांत्रिकी महाविद्यालय, मेडिकल कॉलेज, कृषी महाविद्यालय, एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे उपकेंद्र, स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र स्थापन केले. चंद्रपूरमध्ये होणारे कॅन्सर हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, सैनिक शाळा बघितल्यास अभिमान वाटेल. अशी सर्वोत्तम कामे करण्यात आली आहे.

 

*चंद्रपूर जिल्ह्याकरिता गौरवाची बाब*

चंद्रपूरमध्ये दोन गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आले असून आता चंद्रपूरचे नाव देखील देशाच्या बाहेर जात आहे. ही जिल्हावासीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले. अयोध्येच्या श्रीराम मंदिराच्या गर्भगृहापासून तर प्रत्येक द्वार बल्लारपूरच्या काष्ठापासून तर संसदेचा प्रत्येक दरवाजा बल्लारपूरच्या काष्ठापासून तयार झाले आहे. पुन्हा एक पाऊल पुढे टाकत पीएमओचे संपूर्ण कार्यालय बल्लारपूरच्या लाकडापासून तयार होत आहे. पंतप्रधानांची सर्वोच्च खुर्ची देखील बल्लारपूरच्या लाकडापासून निर्मित असेल ही गौरवाची बाब असल्याचे ना.मुनगंटीवार म्हणाले.

 

*एमआयडीसीच्या धर्तीवर एफआयडीसी*

जोधपूर हे देशातील सर्वात जास्त फर्निचर एक्सपोर्ट करणारे केंद्र आहे. येथून साधारणत: वर्षाला 300 कोटी रुपयांचे फर्निचर एक्सपोर्ट केल्या जाते. त्यामुळे एम.आय.डी.सी.च्या धर्तीवर फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एफ.आय.डी.सी.) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एम.आय.डी.सी.तील 10 एकर जागेमध्ये जगातील सर्वात उत्तम फर्निचरचे काम सुरू करण्यात येत असून चंद्रपूरच्या एफ.आय.डी.सी.मधून फर्निचर एक्सपोर्ट मध्ये चंद्रपूर जोधपुरलाही मागे टाकेल, या दृष्टीने काम करण्यात येत असल्याचेही ना. मुनगंटीवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here