कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला निर्धार
Ø बांधकाम कामगारांच्या कुटुंबाला हातभार ; कामगारांना गृहपयोगी साहित्य व सुरक्षा किटचे वाटप
चंद्रपूर, दि. 8 : जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मोफत गृहपयोगी साहित्याचे वाटप करुन त्यांच्या संसाराला हातभार लावण्यात येत आहे. या ठिकाणी 4 हजार कामगारांची नोंदणी करण्यात आली असून एकूण 30 गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी शासन तत्पर असून कामगारांच्या जीवनमानात बदल घडवून आणण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याची ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
बल्लारपूर येथे कामगार कल्याण मंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला कामगार विभागाचे नोंदणी अधिकारी सचिन अरबट, चंदनसिंह चंदेल, अजय दुबे, काशीनाथ सिंग, राजीव गोलीवार, दिनेश गोंदे, अशोक सोनकर, रामजनम चक्रवती, आकाश ठुसे आदी उपस्थित होते.
एकमेकांना सहकार्य केल्याशिवाय विकासाच्या बाबतीत पुढे जाता येणार नाही, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘याठिकाणी 4 हजार कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. एकूण 30 गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. येथून साहित्य घेवून जाताना बहिण चेहऱ्यावर आनंद घेऊन जावी, हा प्रयत्न आहे. राज्य सरकारकडून सर्वांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अमलात आणली. या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने विशेष लक्ष देत जिल्ह्यातील 4 लाख 70 हजार बहिणींचे अर्ज मंजूर केले. काही बहिणींचे आधार लिंक नसल्याने पैसे जमा होऊ शकले नाही. मात्र, कोणतीही बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही, असे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आश्वासित केले.
आर्थिक अडचणींमुळे गरीब कुटुंबातील मुली शिक्षण घेऊ शकत नाहीत. आता सर्व प्रवर्गातील मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता 100 टक्के मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात अनेक वाचनालये उभारण्यात आलीत. तसेच मुली व महिलांमध्ये आकाशाला गवसणी घालण्याची क्षमता निर्माण व्हावी यासाठी कौशल्य विकासाचे दालन उघडण्यात आले आहेत. राज्यशासन बहिणींच्या पाठीशी पूर्ण शक्तीने उभे आहे. लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुणांचा हाताला काम मिळेल, याचा विचार देखील शासन करीत आहे. मला सर्वांच्या आशीर्वादाने व सहकार्याने जिल्ह्यात अनेक विकास कामे करता आली. जिल्हा विकासाच्या मार्गावर अग्रेसर राहावा, हा संकल्प घेऊन कार्य करण्यात येत असल्याचेही मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले, आयुष्यात राजकारण म्हणजेच समाजकारण याच नियमाने काम केले आहे. मतदारसंघात दोन विशेष योजना केल्यात. यामध्ये सर्व जातींना घरकुल देण्याचा निर्णय घेतला. शबरी आवास योजना फक्त ग्रामीण भागासाठी मर्यादित होती, आता शहरी भागातही लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही घरकुलांच्या अनुदानाची मर्यादा 2.50 लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्या कुटुंबांकडे स्वतःच्या हक्काची जमीन नसेल अशा कुटुंबांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी योजना आणली. त्यासोबतच, चंद्रपूरमध्ये 10 हजार तर बल्लारपूर मध्ये 3 हजार घरे बांधण्याचा संकल्प केला असल्याचेही श्री . मुनगंटीवार म्हणाले.
सेवा करण्यात आनंद
एखाद्याची सेवा करणे यापेक्षा दुसरा आनंद नाही. नागरिकांसाठी आयुष्यमान भारत, जीवनदायी योजना तसेच मतदार संघातील सर्व हॉस्पिटल उत्तम करण्यात येत आहे. लाडक्या बहिणीचे 1500 रुपये, मोफत धान्य, दिवाळीचा आनंदाचा शिधा, महिलांना बसमध्ये 50 टक्के सवलत, आरोग्याची सुरक्षा आणि घरकुलावर पहिले नाव पत्नीचे राहील, असा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या देशाला आपण भारत माता म्हणतो भारत मातेची जय तेव्हाच होऊ शकते, जेव्हा प्रत्येक कुटुंबातल्या मातेचा जय होईल, हा संकल्प सर्वांना मिळून करायचा आहे, असे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक पाऊल
काही दिवसापूर्वी कोरपना येथे बारा वर्षाच्या मुलींवर अत्याचार करण्यात आला. जिल्ह्यात अत्याचारांसारख्या घटना घडू नये यासाठी “लाडकी बहीण सुरक्षित बहीण”अंतर्गत पहिला टप्प्यात सर्व शाळांमध्ये पोलीस कॉंन्स्टेबलची नियुक्ती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये त्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव, संपर्क क्रमांक उपलब्ध असेल. जेणेकरुन, मुली तक्रार करू शकतील व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करता येईल. त्यामुळे मुलींची छेडछाड व अत्याचारासारख्या घटना थांबविता येतील. “डायल 112” च्या माध्यमातून गरीब कुटुंबातील कामकाजी महिलांचे संरक्षण व सुरक्षिततेसाठी पावले उचलण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत. एखादी कामकाजी महिला रात्रीच्या वेळी घरी जात असल्यास तिच्या सुरक्षिततेसाठी पोलीस मित्रांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात येत असून कामकाजी महिलांना त्यांच्या घरापर्यंत सोडण्यात येईल. यासोबतच, लाडक्या बहिणींच्या समस्या सोडविण्यासाठी पोर्टल विकसित करण्यात येणार असल्याचेही ना. मुनगंटीवार म्हणाले.
बांधकाम कामगारांना गृहपयोगी साहित्याचे वाटप
रविंद्र सोनटक्के, छाया वैरागडे, आकांक्षा चांदेकर, पिंकी हजारे, मनोज वैरागडे, छाया साळवे, रवी टोंगे, नरेश वाटकर, मारुती टोंगे, आकाश गिरडकर आदी बांधकाम कामगारांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गृहउपयोगी वस्तुचे वाटप करण्यात आले.