अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन ‘ॲक्शन’ मोडवर

0
25

अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन ‘ॲक्शन’ मोडवर

 

Ø जिल्हाधिका-यांनी घेतला नार्को – कोऑर्डिनेशन समितीचा आढावा

 

चंद्रपूर, दि. 7 : जिल्ह्यात अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी तसेच वाहतूक, साठवणूक व विक्रीला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय नार्को – कोऑर्डिनेशन समिती गठीत करण्यात आली असून दर महिन्याला या समितीचा आढावा नियमितपणे घेण्यात येतो. सोमवार (दि.7) रोजी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सदर समितीचा आढावा घेऊन अंमलबजावणीबाबत संबंधित यंत्रणेला निर्देश दिले.

 

वीस कलमी सभागृह येथे झालेल्या या बैठकीला जिल्हाधिका-यांसह जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, शिक्षणाधिकारी निकिता ठाकरे, उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक अभिजित लिचडे आदी उपस्थित होते.

 

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्ह्यातील माध्यमिक शाळा, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षण विभागाने पोलिस विभागाच्या सहकार्याने अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी. यासाठी एनसीसी आणि एनएसएसची सुध्दा मदत घ्यावी. योग्य नियोजन करून शाळानिहाय जनजागृतीपर आराखडा सादर करावा. अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील किती मेडीकल स्टोअर्समध्ये सीसीटीव्ही लागले आहेत, त्याची तपासणी करावी. जिल्ह्यात खसखस किंवा गांजाची लागवड होणार नाही, याबाबत कृषी विभागाने दक्ष राहावे. कृषी सहायकांच्या मदतीने अशा प्रकारची लागवड आपपल्या परिसरात झाली किंवा कसे, याची तपासणी करण्यास सांगावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

 

पुढे ते म्हणाले, गुप्तचर विभागाने अंमली पदार्थ बाळगणा-या तसेच विक्री करणा-या व्यक्तिंची माहिती गोळा करून योग्य कारवाईकरीता पोलिस विभागाकडे सुपूर्द करावी. पोलिस विभागाने अंमली पदार्थ बाळगणा-यांवर कडक कारवाई करावी. तसेच अंमली पदार्थाची लागवड, विक्री, वाहतूक व सेवन करणा-यांची माहिती नागरिकांकडे असल्यास ‘वंदे मातरम’ या प्रणालीचा टोल फ्री क्रमांक 18002338691, टोल फ्री क्रमांक 112 तसेच चाईल्ड लाईनचा टोल फ्री क्रमांक 1098 यावर माहिती द्यावी. एम.आय.डी.सी. परिसरात बंद असलेल्या कारखान्यांची पाहणी करावी. तेलंगणा व चंद्रपूरच्या सीमेवर असलेल्या जंगलात अवैधरित्या अंमली पदार्थाची लागवड होणार नाही, यासाठी वनविभागाने नियमित पेट्रोलिंग करावे, अशाही सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here