महिलांचा सन्मान व सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध* 

0
16

*महिलांचा सन्मान व सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध*

 

*पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास*

 

*नांदगाव पोडे (ता. बल्लारपूर) येथे महिला मेळाव्याचे आयोजन*

 

*चंद्रपूर, दि. 07: आज कोणत्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवीत आहेत. महाराष्ट्र सरकारने मुलींना मोफत शिक्षण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सन्मान योजना या माध्यमातून महिलांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. आज महिलांना व त्यांच्या कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिलांनी आपली आर्थिक प्रगती साधावी. या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून महिलांचा सन्मान व त्यांच्या सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.*

 

नांदगाव पोडे (ता. बल्लारपूर) येथे आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सरपंच (नांदगाव पोडे) सुनिता वैद्य, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर देऊळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. गोरगरिबांना मदत करणे व बहिणींना सहकार्य करणे हे सरकारचे कर्तव्य आहे, असे सांगून ना. मुनगंटीवार म्हणाले, ‘महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्यात चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे, याचा मला अभिमान आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतंर्गत जिल्ह्यातील 2 लक्ष 75 हजाराच्या वर महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. मात्र, अजूनही 20 हजार महिलांचे आधार लिंक (केवायसी) नसल्यामुळे लाभ मिळू शकला नाही. कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही. प्रत्येक पात्र महिलेला योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.’

 

युवकांपासून तर ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक वयोगटासाठी शासन विविध योजना राबवित आहे. मात्र, माहितीअभावी या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. तीर्थक्षेत्र दर्शनाचे जेष्ठांचे स्वप्न साकार करण्यासाठी जळगाव व कोल्हापूर येथून तीर्थदर्शनासाठी ट्रेन रवाना करण्यात आल्या. येत्या काही दिवसात चंद्रपुरातून सुद्धा ट्रेन रवाना करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक ज्येष्ठांनी तीर्थदर्शन योजनेचे फॉर्म भरून घेण्याचे आवाहन पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांनी केले. नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी प्रत्येक गावांमध्ये महाआरोग्य शिबिरे घेण्यात येत आहे. प्रत्येक गावांमध्ये विकास कामे केली असून विकासकामांतून जिल्हा पुढे नेला असल्याचेही ते म्हणाले.

 

*महिलांच्या सुरक्षेसाठी निर्णय*

कोरपना येथे अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची दखल घेऊन जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एका महिला पोलीसची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मुलींची छेडछाड व इतर तक्रारींबाबत पोलीस विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. जेणेकरुन, बदलापूर व कोरपनासारख्या घटना थांबविता येतील, असे ना. मुनगंटीवार म्हणाले.

 

*मुलींचे शिक्षण, एसटीचा प्रवास!*

आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 100 टक्के शुल्क सवलत देण्यात येत असून शिक्षणाचा सर्व खर्च शासन करणार आहे. महिलांना एसटीतून प्रवासात 50 टक्के सवलत तर 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासात 100 टक्के सवलत देण्यात येत आहे. स्व. सुषमा स्वराज यांच्या नावाने बल्लारपुरात कौशल्य विकास केंद्र कार्यान्वित होत असून मुलींना व बचत गटातील महिलांना हे केंद्र फायदेशीर ठरणारे आहे. मुलींच्या शिक्षणाला गरिबी आडवी येते. त्यांना योग्य शिक्षणासह कौशल्य प्रशिक्षण मिळावे तसेच शिक्षणाच्या बाबतीत महिला मागे राहू नये हि अडचण दूर करण्यासाठी सर्व जातीच्या मुलींना आकाशाला गवसणी घालण्याची संधी एस.एन.डि.टी विद्यापीठाच्या माध्यमातून चालून आली आहे. तसेच बचत गटांमार्फत उत्पादित वस्तू विक्रीसाठी चंद्रपूर येथे बाजारहाटची निर्मिती तसेच फूड कोर्ट उभारण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here