जिल्ह्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात 35 कोटी 20 लक्ष 96 हजार रुपये जमा
Ø शासनाच्या वतीने 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5 हजार रुपयांचे अर्थसहाय्य
चंद्रपूर, दि.4 : राज्य शासनाने खरीप हंगाम 2023-24 मधील कापूस व सोयाबीन पिकाच्या लागवडीची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये असे दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत जाहीर केली आहे. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक 66860 शेतक-यांच्या खात्यात 35 कोटी 20 लक्ष 96 हजार 191 रुपये जमा करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन ही प्रमुख पिके आहेत. खरीप हंगाम 2023-24 मध्ये जिल्ह्यात एकूण पेरणी खालील सर्वसाधारण क्षेत्र 4 लक्ष 58 हजार 857 हेक्टर असून यामध्ये सोयाबीन पिकाखाली क्षेत्र 73 हजार 39 हेक्टर तर कापूस पिकाखाली क्षेत्र 1 लक्ष 69 हजार 936 हेक्टर आहे. सोयाबीन आणि कापूस ही दोन्ही पिके मिळून जिल्ह्यात एकूण 2 लक्ष 42 हजार 975 हेक्टर क्षेत्र म्हणजेच एकूण सर्वसाधारण क्षेत्राच्या 52.95 टक्के क्षेत्र या दोन पिकाखाली आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5 हजार रुपयांचे अर्थसहाय्य या योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील 41287 कापूस उत्पादक शेतक-यांच्या खात्यात 22 कोटी 8 लक्ष 64 हजार 886 रुपये तर 25573 सोयाबीन उत्पादक शेतक-यांच्या खात्यात 13 कोटी 12 लक्ष 31 हजार 305 रुपये असे दोन्ही पिके मिळून जिल्ह्यातील 66860 शेतक-यांच्या खात्यात 35 कोटी 20 लक्ष 96 हजार 191 रुपये जमा करण्यात आले आहेत.
वरील मदतीसाठी लाभार्थी निवड करत असताना पात्र लाभार्थी खातेदारांच्या याद्या ग्रामपंचायत आणि गावात ठळक ठिकाणी लावण्यात आल्या होत्या. गावात राहणाऱ्या बहुतांशी पात्र शेतकऱ्यांकडून त्यांचे आधार संमती पत्रे घेण्यात आली व त्यानुसार त्यांना वरीलप्रमाणे मदत देण्यात आली. यात अनेक खातेदार बाहेरगावी इतर व्यवसायानिमित्त असल्याने त्यांचे आधार संमती मिळण्यास अडचणी आहेत. परंतु पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्याकडून ऑनलाईन आधार संमती घेण्याची कार्यवाही सुरू आहे. काही खातेदार मयत असून त्यांच्या वारस नोंदी अपूर्ण आहेत. सामाईक खातेदार यांची एका नावावर संमती होत नाही. तसेच काही संमती देत नाहीत तर काही गावाबाहेर राहतात, अशा कारणांमुळे उर्वरित आधार संमती माहिती अपूर्ण आहे. तरी त्यांची माहिती ज्या पध्दतीने प्राप्त होईल, त्यानुसार त्यांना मदत देण्याची कार्यवाही सुरू राहणार आहे.
ज्या खातेदारांची खरीप 2023 मध्ये कापूस सोयाबीनची लागवड होती, मात्र त्यांचे नाव ई -पिक पाहणी यादीत आले नाही, त्यांची नावे तलाठ्यांकडून घेऊन तसेच जी गावे ऑनलाईन भूमि अभिलेख वर नाहीत, त्यांची कापूस सोयाबीन उत्पादक माहिती तलाठी यांच्याकडून प्रमाणित करून घेऊन मदत देण्याची कार्यवाही सुरु राहणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी कळविले आहे.