*वर्धा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न करणार*

0
71

*वर्धा, दि. 18* : आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याची क्षमता वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. त्यासाठी उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा खेळाडूंना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या सुविधा निर्माण करण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील. राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे केवळ तीनच सिंथेटिक स्मार्ट ट्रॅक आहेत. हे तिन्ही ट्रॅक चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. आता त्याच धर्तीवर वर्धा जिल्ह्यात ट्रॅक तयार करण्यात येतील, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

 

विकास भवन येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने नामवंत खेळाडूंच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार डॉ.पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुमित वानखडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुनील गफाट, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वैशाली येरावार, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड आदी उपस्थित होते.

 

जिल्ह्यातील प्रत्येक खेळाडूने त्या आवडीच्या क्रीडा प्रकारात नावलौकिक मिळविला पाहिजे. त्यादृष्टीने त्यांना आवश्यक सोयीसुविधा देण्याकरीता शासन त्यांच्या पाठीशी आहे, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

 

सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांबद्दल सांगताना ते म्हणाले, ‘तरुणांसाठी रोजगाराच्या योजनांसह शेतकऱ्यांसाठी सुद्धा विविध योजना राबविल्या जात आहेत. माझी कन्या भाग्यश्री, निराधार योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. गोरगरिबांना घरकुल उपलब्ध व्हावे यासाठी ओबीसी घटकाकरिता घरकुल योजना सुरु करण्यात आली आहे.’ भारत पाकिस्तान सिमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून महाराजांची वाघनखे लंडनवरुन आणण्यात येत असल्याचे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

 

यावेळी खासदार रामदास तडस यांनीही विचार मांडले. ते म्हणाले, ‘खेळाडूंना शासकीय नोकरीमध्ये संधी देण्याचे काम राज्य शासन करीत आहे. नोकरीमध्ये संधी दिल्यानंतर या नामवंत खेळाडूंना आशियाई व ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये नशीब आजमावण्यासाठी किमान तीन वर्षे संधी मिळणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कुस्ती प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रामुळे राज्यातील कुस्तीपटूंना मोठा लाभ मिळणार आहे.’

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार डॉ. भोयर यांनी केले. वर्धेतील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविणे ही अभिमानाची बाब आहे. तालुकास्तरावर क्रीडा संकुल तयार केल्यामुळे जिल्ह्यात आंतराष्ट्रीय खेळाडू तयार होण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार भोयर यांनी व्यक्त केला.

 

 

*सेवाग्राम शब्दातच सेवा!*

महात्मा गांधी यांची पावनभूमी असलेल्या सेवाग्राम या नावातच ‘सेवा’ शब्द आहे. त्यामुळे येथील नागरिकांसाठी सेवा भावना जोपासत येथील जनता हीच आपला परिवार आहे, हे मानून त्यांच्या कल्याणासाठी येत्या काळात कामे केली जातील,’ अशी ग्वाही पालकमंत्री ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली

 

*प्रतिभावंतांचा गौरव*

यावेळी ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते आशियाई क्रीडा स्पर्धेत 20 वर्षाखालील क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे तसेच आयपीएलमध्ये हैदराबाद संघाचे प्रतिनिधीत्व करणारा क्रिकेटपटू सौरभ दुबे, स्वीडन येथे झालेल्या हॅन्डबॉल खेळामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणारा अनुज मोहन ठाकरे, वेदांत दिगांबर घोडमारे, रायफल शुटींगमध्ये राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक प्राप्त करणारा प्रथमेश विजय मेढेवार, क्रीडा क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या महिला पोलिस सुनयना डोंगरे व इटली, रशिया, नेपाळ येथे जलतरण स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करुन देशाचे नाव उज्ज्वल करणारे आंतरराष्ट्रीय वयोवृध्द खेळाडू गिरीष उपाध्याय यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here