वृद्धाश्रमातील 16 ज्येष्ठांना निराधार योजनेअंतर्गत मंजुरी आदेश प्रधान
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चा उपक्रम
Ø डेबु सावली, देवाडा येथे आंतरराष्ट्रीय वृद्ध दिन साजरा
चंद्रपूर, दि. 2 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर मार्फत डेबू सावली, देवाडा वृद्धाश्रमात आंतरराष्ट्रीय वृद्ध दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भीष्म यांच्या हस्ते वृद्धाश्रमातील 16 ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या निराधार योजनेअंतर्गत मंजुरी आदेश प्रदान करण्यात आले व ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला नायब तहसीलदार राजू धांडे, श्री खंडाळे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी मनोज पाठवते, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी उपस्थित होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर कार्यालयाचे सचिव सुमीत जोशी यांनी वृद्धाश्रमाला भेट दिली असता ज्येष्ठ नागरिकांनी निराधार योजनेचा लाभ कसा मिळू शकेल, याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्याप्रमाणे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भीष्म यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (ज्येष्ठ नागरिकांसाठी विधी सेवा योजना 2016) अंतर्गत चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार यांच्याकडे याबाबत विचारणा करण्यात आली. संजय गांधी निराधार योजना व अन्य काही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असल्याचे कळल्यानंतर आवश्यक कागदपत्रे व विहित नमुन्यातील अर्ज भरून घेण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे राहुल शिरसागर तथा नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार व इतर कर्मचारी हे डेबू सावली येथील वृद्धाश्रमात पोहोचले आणि त्यांनी तेथे जाऊन संबंधित वृद्धांचे अर्ज भरून घेतले व दाखल केले. प्रक्रियेकरिता अधिवक्ता महेंद्र आसरे व धनंजय तावडे यांनी सहकार्य केले.
वृद्धांचे बँक खाते नसल्यामुळे बँक ऑफ इंडिया शाखा जेटपूरा गेट येथे शाखाधिकारी मनोज पाठवते यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी सुद्धा वृद्धांसाठी वृद्धाश्रमात जाऊन बँक खाते उघडण्याची कार्यवाही पूर्ण केली. याप्रमाणे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांचे बँक खाते उघडण्यात आले. त्यानुसार तहसील कार्यालयामार्फत 16 वृद्धांना ज्येष्ठ नागरिकांना निराधार योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये मिळण्यासाठीचे आदेश पारित करण्यात आले. सदर आदेशाची प्रत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भीष्म यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली यावेळी वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव सुमित जोशी यांनी कळविले आहे.