*पर्यावरणाचे रक्षण ही सामाजिक जबाबदारी – ना. सुधीर मुनगंटीवार*

0
57

*पर्यावरणाचे रक्षण ही सामाजिक जबाबदारी – ना. सुधीर मुनगंटीवार*

 

*पर्यावरण पूरक बांबू ट्री गार्ड उत्पादित केल्याबद्दल व्यक्त केले समाधान*

 

*वनविभागातर्फे जागतिक बांबू दिनानिमित्त बांबू ट्री गार्ड,बांबू चारकोल साबण उत्पादनांचे लोकार्पण*

 

 

*चंद्रपूर, दि. १९: वसुंधरेच्या संरक्षणासाठी निसर्गाचे शोषण थांबावे, पर्यावरणाचे रक्षण व्हावे ही सामाजिक जबाबदारी असून वनविभागाने महाराष्ट्र बांबू बोर्डाच्या माध्यमातून जैविक विघटन होऊ शकेल अशा बांबू ट्री गार्डचे तसेच बांबू चारकोल साबणाचे उत्पादन जागतिक बांबू दिनाच्या औचित्य साधून सुरू केले याचा मनापासून आनंद होत असल्याचे गौरवोद्गार राज्याचे वन सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज काढले. महाराष्ट्र वन विभाग व बांबू बोर्डाच्या वतीने जागतिक बांबू दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे ना. मुनगंटीवार बोलत होते.*

 

यावेळी वनबल प्रमुख श्रीमती शोमिता विश्वास, प्रधान मुख्य वनसंरक्षक (नियोजन व विकास) श्री. कल्याणकुमार यांच्यासह वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महिला बुरड गटाने उत्पादित केलेल्या बांबू ट्री गार्ड तसेच बांबू चारकोल सोप (साबण) चे लोकार्पण करण्यात आले.

 

यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, २०१३ मध्ये पॅरिस येथे संपन्न झालेल्या एका जागतिक परिषदेत पृथ्वीच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी मनुष्याकडून निसर्गावर मात करत नवे शोध लावण्यासाठी वसुंधरेचा शाप ओढवल्याबाबत गांभीर्याने चर्चा झाली. त्यानंतर देखील पर्यावरणावरील होत असलेल्या आक्रमणाची चिंता वाढत गेली. पर्यावरणाचे रक्षण करत असताना ट्रिगार्ड मात्र आपण दुर्दैवाने प्लास्टिकचेच वापरत होतो; पण महाराष्ट्राच्या बांबू बोर्डाने जागतिक बांबू दिनानिमित्त जैविक विघटन होऊ शकेल अशा बांबूच्या ट्री गार्डचे उत्पादन करून, पर्यावरण रक्षणात मोठे पाऊल उचलले आहेच; परंतु रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध करून दिल्या याचा मला मनापासून आनंद होत आहे, असे ते म्हणाले.

 

 

*ग्रामीण महिला व बचत गटांचा होणार विकास*

 

बांबू चारकोल साबण ही अतिशय उत्तम कल्पना असून याचे योग्य पद्धतीने डिजिटल मार्केटिंग करणे अपेक्षित असल्याचे सांगून स्पर्धेच्या या युगात उत्तम पॅकेजिंग व उत्तम वितरण याकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना ना. मुनगंटीवार यांनी केल्या. आदिवासी तसेच मानव विकास कक्षेत असलेल्या तालुक्यांमध्ये रोजगारासाठी शासनाकडे भरपूर निधी उपलब्ध असतो; त्या माध्यमातून महिला बचत गटांना ट्री गार्ड बनवण्याचे किंवा बांबू चारकोल साबण बनवण्याचे प्रशिक्षण योग्य पद्धतीने दिल्यास निश्चितपणे या भागातील ग्रामीण महिलांचा व बचत गटांचा विकास होईल अशी अपेक्षा ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

 

*राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाच्या कडेला वापरता येतील बांबू ट्री गार्ड*

 

जागतिक बांबू दिनानिमित्त बांबू ट्रीगार्डची निर्मिती करून वनविभागाने मोठे पाऊल उचलले आहे. परंतु एवढ्यावरच न थांबता आपण सातत्याने पाठपुरावा करून राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला लागणाऱ्या वृक्ष लागवडी संदर्भात माहिती घेऊन त्यासाठी बांबू ट्री गार्ड वापरता येतील अशा पद्धतीने प्रस्ताव तयार करावा, राज्याच्या बांधकाम विभागाला देखील असा प्रस्ताव आपण देऊ शकतो, अशा सूचना करत यासंदर्भात शिक्षण प्रशिक्षणाकडेही लक्ष देण्याचे सुचविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here