मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

0
14

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Ø पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून 30 हजार रुपयापर्यंतच्या मर्यादेत लाभ

चंद्रपूर, दि. 18 : राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष वय किंवा त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना एकदा तरी तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते. परंतु गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्याच्या आर्थिक परीस्थितीमुळे किंवा पुरेशी माहिती नसल्याने तीर्थस्थळाला जाऊ शकत नाही. सदर बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळाना जाऊन मनःशांती मिळावी तसेच अध्यात्मिक पटली गाठणे सुकर व्हावे, यासाठी राज्य सरकारने भारतातील तसेच राज्यातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची /दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाने केले आहे.

योजनेचे उद्दिष्ट : राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा उपलब्ध करून देणे. या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारतातील प्रमुख तीर्थस्थळाचा समावेश राहील. सदर योजनेंतर्गत निर्धारित तीर्थस्थळापैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती 30 हजार रुपये इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इ. सर्व बाबीचा समावेश राहील. अर्जदार 75 वर्षाच्या वरील असल्यास त्यांच्यासोबत पती / पत्नी किंवा सहाय्यक तीर्थ दर्शनाच्या प्रवासासाठी इच्छुक असल्यास सहाय्यकाचे संपूर्ण नाव व त्याचे वय (सहाय्यकाचे वय किमान 21 वर्ष व कमाल 50 वर्ष असावे)

पात्रतेचे निकष व अटी, शर्ती : 1. लाभार्थ्यांचे वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे 2. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. 3. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. 4. वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोगय तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्टया निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे : 1. लाभार्थ्याचे आधार कार्ड/ रेशन कार्ड 2. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र /महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला (लाभाथ्यांचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्यांचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला या चार पैकी कोणतेही एक ओळखपत्र/ प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.) 3. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पनाचा दाखला किंवा पिवळे/ केशरी रेशनकार्ड 4. पासपोर्ट आकाराचा फोटो 5. जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक 6. सदर योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

मूळ अर्जदारासह जीवनसाथी/ सहाय्यकाच्या प्रवासासंबंधीच्या तरतुदी : 1. 75 वर्षावरील अर्जदाराला जीवनसाथी किंवा सहाय्यक यांचे वय 60 वर्षापेक्षा कमी असले तरीही जीवनसाथी किवा सहाय्यक यापैकी एकाला अर्जदारासोबत नेण्याची परवानगी असेल. परंतु अर्जदाराने त्याच्या अर्जात असे नमूद करणे आवश्यक आहे की, त्याचा जीवनसाथी/ सहाय्यक देखील प्रवास करण्यास इच्छुक आहे. 2. सहाय्यकाचे किमान वय 21 वर्ष व कमाल 50 वर्ष असावे. एखादा मदतनीस प्रवासात घेतल्यास, त्याला देखील त्याच प्रकारच्या सुविधा मिळतील. ज्या प्रवाशाला परवानगी आहे. सहाय्यक हा शारीरिकदृष्टया निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरुस्त असावा.

3. सोबत प्रवास करताना जोडीदारासोबत मदतनीस घेण्याची सोय नसेल. जर दोन्ही पती –पत्नीचे वय 75 वर्षा पेक्षा जास्त असेल आणि अर्जामध्ये मदतनीस नोंदणीकृत असेल, तर तो पाठविला जाऊ शकतो. 4. प्रवासी पती-पत्नी आणि सहाय्यकांनी प्रवासाशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक असेल.

अर्ज कसा करावा : अर्जदारांनी योजनेच्या विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज शासन निर्णयात नमुद अटीनुसार सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर कार्यालयात सादर करावा. तसेच सर्व तहसील कार्यालय, सर्व पंचायत समिती कार्यालय येथे अर्ज सादर करता येईल.

अधिक माहितीकरिता येथे करा संपर्क : सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर शासकीय दुधडेयरी जवळ, जलनगर वार्ड, चंद्रपूर (मो. न. 9307409938)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here