निसर्ग मार्गदर्शक प्रशिक्षणातून जैवविविधता व आदरतिथ्य व्यवस्थापनेचे कौशल्य Ø ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा उपक्रम

0
68

निसर्ग मार्गदर्शक प्रशिक्षणातून जैवविविधता व आदरतिथ्य व्यवस्थापनेचे कौशल्य

 

Ø ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा उपक्रम

 

चंद्रपूर, दि. 2 : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग मार्गदर्शकांचे (इको गाईड) वने व वन्यजीव तसेच आदरतिथ्य व्यवस्थापन या विषयावर निसर्ग मार्गदर्शक प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. या व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रात 6 पर्यटन गेटसाठी 119 निसर्ग मार्गदर्शक तर बफर क्षेत्रामध्ये 16 पर्यटन गेटसाठी 249 असे एकूण 368 निसर्ग मार्गदर्शक पर्यटकांना जिप्सी वाहनाद्वारे पर्यटन घडवून आणतात.

 

या निसर्ग मार्गदर्शकांचे विविध टप्प्यामध्ये प्रशिक्षण आयोजित करण्यात येत असते. या वेळेस प्रथम व दुसऱ्या टप्प्यामध्ये कोर क्षेत्रातील 119 तर बफर क्षेत्रातील 41 तसेच मध्यचांदा प्रादेशिक विभागातील कारवा-बल्लारपूर निसर्ग पर्यटन सफारीतील 08 असे एकूण 168 निसर्ग मार्गदर्शकांचे प्रशिक्षण ऑगस्ट 2024 मध्ये पूर्ण झाले आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी 7 दिवसाचा होता. यामध्ये वने व वन्यजीवांशी संबंधित विविध विषयाचे तज्ज्ञ प्रशिक्षकांनी प्रशिक्षण दिले आहे. तसेच वनक्षेत्रात प्रत्यक्ष निरीक्षण अनुभवण्यासाठी क्षेत्रीय भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सस्तन प्राणी, ताडोबातील पक्षी विविधता, फुलपाखरे व चतुर ओळख, ताडोबातील वनस्पती, सरपटणारे प्राणी, वनाची जैवविवीधता याशिवाय विशेष आदरतिथ्य व्यवस्थापन प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास, सीपीआर -जीवनरक्षक प्रक्रिया व इंग्लिश स्पिकिंग अभ्यासक्रमाचे नियमित आयोजन केले होते. सोबतच श्रध्येय अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उद्यान, विसापूर येथे सुद्धा एक दिवसीय प्रत्यक्ष क्षेत्रीय भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

 

सदर निसर्ग प्रशिक्षकामध्ये संजय करकरे, अनिरुद्ध चावजी, अनिल माळी, बहार बाविस्कर, भीमराव लाडे, अमित सेटीया, रुंदन कातकर, दिव्या भारती (IFS), सुमय्या निखत, योगिता चाफेकर, कौशल्य दत्ता, डॉ. त्रिपाठी, डॉ. प्रसाद भावसार इत्यादी प्रशिक्षकांनी संबंधित विषय सादरीकरण व वन क्षेत्रीयभेटीच्या माध्यमातून समजावून सांगितले. याशिवाय उर्वरित बफर क्षेत्रातील निसर्ग मार्गदर्शकांचे प्रशिक्षण वन अकादमी, चंद्रपूर येथे सुरवात झाली असून 60 निसर्ग मार्गदर्शकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

 

सदर निसर्ग मार्गदर्शक प्रशिक्षण मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तर उपसंचालक (बफर) तथा लेफ्ट. कुशाग्र पाठक, उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी, विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे, यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण पूर्णत्वास नेण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण गोंड, योगिता मडावी व त्यांच्या चमूने प्रयत्न केले. सदर प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून प्रफुल्ल सावरकर यांनी भूमिका पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here