*विश्व ब्राह्मण पांचाळ समाजाचे हृदय सोन्यासारखे*
*ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे गौरवोद्गार*
*विश्व ब्राह्मण पांचाळ समाज समितीचा गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा*
*चंद्रपूर,दि.०२ – विश्व ब्राह्मण पांचाळ समाजाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सोन्याशी संबंधित आहे. सोन्याचे काम करता करता या समाजाचे हृदयसुद्धा सोन्याचे झाले आहे, असे गौरवोद्गार राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज (रविवारी) काढले. विश्व ब्राह्मण पांचाळ समाज समितीतर्फे गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.*
व्यासपीठावर अतुलराव कालेश्वरवार, रत्नाकर बोगोजवार, भाजपाचे महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्हा कोषाध्यक्ष मनोज सिंघवी, माजी जि. प. अध्यक्ष सुधाकरराव कुंदोजवार, नागाचारी मंदिर ट्रस्ट समितीचे अध्यक्ष विवेक आंबोजवार, विश्व ब्राह्मण पांचाळ समाज समिती चंद्रपूरचे अध्यक्ष सुधाकरराव श्रीपुरवार, उपाध्यक्ष गिरीश कंठीवार, रवींद्र मूलकलवार, सचिव बंडूजी देवोजवार, कोषाध्यक्ष विठ्ठलराव मुडपल्लीवार, सहकोषाध्यक्ष प्रा. अनुज कनोजवार, महिला समितीच्या अध्यक्षा प्रतिभाताई वंगलवार, युवक समिती अध्यक्ष सुहास वरपल्लीवार यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, संपूर्ण जिल्ह्यातून आलेले समाजबांधव उपस्थित होते.
ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘विश्व ब्राह्मण पांचाळ समाजातील विलास मडपूवार, आबोजवार अशा अनेक जणांचा मला सहवास लाभला आहे. दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा आपल्या समाजाची रेष कशी मोठी करता येईल, यासाठी सर्वांचे सदैव प्रयत्न असतात. हा समाज संस्कारित आहे. प्रगतिशील विचारांवर श्रद्धा ठेवणारा आहे. महत्त्वाचे म्हणजे सात्विक आणि प्रामाणिक आहे.’
*आपल्या आडनावांमध्येच ‘वार’*
माझ्या आणि तुमच्या समाजाच्या आडनावांमध्ये ‘वार’ आहे. ज्यांच्या आडनावांमध्ये ‘वार’ उल्लेख येतो, त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असते. जो समाजाचे संस्कार बिघडवत असेल, संस्कृती नष्ट करत असेल त्याच्यावर आध्यात्मिक मार्गाने ‘वार’ करण्याची जबाबदारी या सर्व लोकांवर असते, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
*गुणवंतांनी स्वार्थी होऊ नये*
समाजातील गुणवंतांचा सत्कार करीत त्यांच्याही आयुष्यामध्ये, ‘शिक्षण हे फक्त वाघिणीचे दूध नाही तर हा संस्काराचा मार्ग आहे’ ही भावना त्यांच्यामध्ये जन्माला यावी. शिकल्यानंतर गुणवंत स्वार्थी होता कामा नये. शिक्षणातून संस्कारित समाज निर्माण व्हायला हवा. पण, कधी कधी शिक्षणातून स्वैराचारी समाजाची निर्मिती होते. ‘मै और मेरा परिवार, बाकी दुनिया बेकार’ असा दृष्टिकोन तयार होतो, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
*अनेकता मैं एकता, ये हमारी विशेषता*
जातच स्वतःला धर्मापेक्षा मोठी मानत असेल तर धर्मावर आघात सुरु होतात. आपल्या देशामध्ये असे प्रयत्न अनेकांनी केले. आठशे वर्ष या देशावर अत्याचार, आक्रमण झाले. पण, हिंदू धर्मामध्ये ‘अनेकता मैं एकता, ये हमारी है विशेषता’ ही एक शक्ती होती. ती शक्ती या समाजाकडे आहे. दुर्दैवाने काही लोक जातीजातींमध्ये वीष कालविण्याचे काम करीत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
*सभागृहासाठी पाच लक्ष*
विश्व ब्राह्मण पांचाळ समाज समितीमार्फत संस्कार, अध्यात्मीक विचारांचे याचे आदान प्रदान व्हावे म्हणून परमपूज्य नागाचारी महाराजांच्या या जागेवर आपण एक सभागृह निर्माण करतो आहे. या संकल्पचित्राचे नुकतेच माझ्या हातून अनावरण झाले. या सभागृहासाठी मी ५ लक्ष रुपयांची मदत जाहीर करतो आहे, अशी घोषणा ना. श्री. मुनगंटीवार यांनी केली.