60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

0
143

60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन

 

योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

Ø पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून 30 हजार रुपया पर्यंतच्या मर्यादेत लाभ

 

चंद्रपूर, दि. 19 : राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष वय किंवा त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना एकदा तरी तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते. परंतु गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्याच्या आर्थिक परीस्थितीमुळे किंवा पुरेशी माहिती नसल्याने तीर्थस्थळाला जाऊ शकत नाही. सदर बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळाना जाऊन मनःशांती मिळावी तसेच अध्यात्मिक पटली गाठणे सुकर व्हावे, यासाठी राज्य सरकारने भारतातील तसेच राज्यातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची /दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाने केले आहे.

 

योजनेचे उद्दिष्ट : राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा उपलब्ध करून देणे. या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारतातील प्रमुख तीर्थस्थळाचा समावेश राहील. सदर योजनेंतर्गत निर्धारित तीर्थस्थळापैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती 30 हजार रुपये इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इ. सर्व बाबीचा समावेश राहील. अर्जदार 75 वर्षाच्या वरील असल्यास त्यांच्यासोबत पती / पत्नी किंवा सहाय्यक तीर्थ दर्शनाच्या प्रवासासाठी इच्छुक असल्यास सहाय्यकाचे संपूर्ण नाव व त्याचे वय (सहाय्यकाचे वय किमान 21 वर्ष व कमाल 50 वर्ष असावे)

 

योजनेच्या अटी व शर्ती

 

महाराष्ट्र राज्यातील 60 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक असावे. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापर्यत असणे अनिवार्य, किंवा अंत्योदय अन्न योजना(AAY)/ प्राधान्य कुटुंब योजना (PHH) / वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखाच्या आत असलेले मात्र प्राधान्य कुटुंब नसलेले (NPH) शिधापत्रिकाधारक. वैद्यकीय अधिका-याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे.

 

कागदपत्रांची माहिती

 

अर्जदाराचे हमीपत्र, लाभार्थ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, लाभार्थ्यांचे नातेवाईकाचे प्रमाणपत्र, जीवनसाथी / सहायकाचे हमीपत्र, जीवनसाथी / सहायकाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, लाभार्थ्याचे आधार कार्ड/रेशनकार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटूंब प्रमुखाचा उत्पनाचा दाखला किंवा पिवळे/केशरी रेशनकार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.

 

योजनेचा लाभ घेण्याकरीता अधिकाअधिक नागरीकांनी अर्ज करण्याचे तसेच अधिक माहिती करीता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याशी संपर्क करावा, असे सामाजिक न्याय विभागाने कळविले आहे.

 

00000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here