- जिल्हा परिषदेत अंमली पदार्थ प्रतिबंधाबाबत शपथ
चंद्रपूर, दि. 13 : सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाद्वारे नशामुक्त भारत अभियान लागू करण्यात आले आहे. मादक पदार्थाच्या गैरवापराच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी देशभरात नशामुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून भारताला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी मोठया प्रमाणावर जागरुकता निर्माण करण्याचा मानस आहे. जिल्हा परिषद चंद्रपूर येथे जिल्हा समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने अंमली पदार्थ विरुध्द प्रतिज्ञा घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.) श्याम वाखर्डे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अश्विनी सोनवणे व समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम उपस्थित होते.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी व्यसनापासून मुक्त राहण्याकरिता व्यसनमुक्ती संस्थाचे मागदर्शन तथा मदत घेण्याबाबत माहिती दिली. तसेच सर्व प्रकारच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. शिक्षणाधिकारी सोनवने यांनी मादक पदार्थाच्या वापरापासून स्वत:ला कसे दूर ठेवून व्यसन मुक्त राहण्याबाबत प्रयत्न करावा, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचा-यांना अंमली पदार्थ विरुध्द प्रतिज्ञा देण्यात आली.
प्रस्ताविकातून समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम म्हणाले, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे नशामुक्त भारत अभियान लागू केले. आहे. सर्व शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक संस्थांमध्ये हा कार्यक्रम मोठया प्रमाणावर घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांचे आभार समाज कल्याण निरिक्षक मनिषा तन्नीरवार यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेतील कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
००००००