गंगापूरच्या नागरिकांसाठी पालकमंत्र्यांनी यंत्रणेला दिले तात्काळ मदतकार्याचे निर्देश
Ø अतिसाराने त्रस्त गावामध्ये शुद्ध पेयजलासाठी आरओची सुविधा
चंद्रपूर, दि. 13 : पोंभूर्णा तालुक्यातील गंगापूरमध्ये अतिसारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची संपूर्ण माहिती घेत नागरिकांना तात्काळ मदत कार्य करण्याचे निर्देश शासकीय यंत्रणेला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. 231 लोकसंख्या असलेल्या या गावात 11 रुग्णांना उपचारासाठी भरती करण्यात आले असून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मदतकार्यासाठी प्रशासनाला आणि आरोग्य यंत्रणेला तत्पर राहण्याचे आदेश श्री. मुनगंटीवार यांनी दिले असून पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी तातडीने आरओची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही दिल्या.
पोंभूर्णा येथील गंगापूर गावात नागरिकांना अतिसारची लागण झाली. 11 रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचार घेऊन घरी पोहचले असून एक महिला हृदयविकाराच्या झटक्याने दगावल्याची माहिती आहे. यासंदर्भात मदत कार्यात असलेल्या स्थानिक कार्यकर्ते व आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत. श्री. मुनगंटीवार यांना ही माहिती कळताच यांनी पदाधिका-यांना गावात मदत करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार अल्का आत्राम, विनोद देशमुख, गंगाधर मडावी, नामदेव डायले, कामिनी गद्देकार, नीलकंठ मेश्राम, प्रवीण कालसर, नितेश शिंदे, मुक्तेश्वर शिंदे, गिरीधर बारसागडे हे गावात पोहोचले. त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना घटनेची माहिती दिली. श्री. मुनगंटीवार यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. गावकऱ्यांनी शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरओची मागणी मंत्री महोदयांकडे केली. श्री. मुनगंटीवार यांनी ही मागणी तत्काळ मंजूर करून प्रशासनाला आरओची व्यवस्था करण्याचे आदेश दिले.
गंगापूर येथे हातपंपाची सुविधा आहे. मात्र गावकरी नदीतील पाणी पिण्यासाठी वापरतात. नदीच्या पात्रातील पाणी गढूळ असल्यामुळे अतिसाराची गंभीर समस्या निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या संदर्भात तातडीने आरओची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिल्या आहे.
००००००